ज्ञानेश्वरीत हेलपाटा/टे अशा अर्थाने एरझार एरिझार असेही शब्द आले आहेत.

उदा० पथिकांचिया एरिझारा । सर्वे एणेंजाणें धनुर्धरा । ....  ज्ञानेश्वरी १३.४८८ (किंवा प्रतीमुसार ४८८च्या आसपासची ओवी ).

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥ ६२॥ ... ज्ञानेश्वरी ६.६२  ( किंवा ६२च्या आसपासची ओवी ).

आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥ .... ज्ञानेश्वरी १३.८०३.

तेथ येरझारी लागि ( पाठभेद : येरझारे लागी )  । जन्ममृत्यूची सुरंगी ( पाठभेद : जन्ममृत्यूंची  सुरंगी ) । सुहावली निलागी ( पाठभेद : सुवालली चांगी ) । संकल्पें येणें (पाठभेद : एणें) ... ज्ञानेश्वरी १३.४८ किंवा १३.४९.

तैसें येणेंची शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारें ( पाठभेद : यरिझारे/येरझारे ) । चिरा पडे ॥....१२.१३५किंवा १३६.

 आधुनिक मराठीत येरझार हा एकवचनी शब्द वापरात नसला,  तरी या स्त्रीलिंगी शब्दाचे  वापरातले अनेकवचन येरझारा होते हे नक्की.  

येरझारे हे सप्तमीचे किंवा तृतीयेचे एकवचनी रूप असले तर 'रे'वर अनुस्वार हवा.  जेथे तो नाही तेथे सप्तमी/तृतीया नाही.  निवृत्तीनाथांनी 'रे'वर अनुस्वार दिलेला दिसत नाही.  ते खरे असल्यास तेथे शब्द पुल्लिंगी अनेकवचनी आहे!