रणजित देसाईंची ही कादंबरी वाचणे हा एक सुखद अनुभव होता. मी हे पुस्तक ५-६ महिन्यांपूर्वी वाचले. त्यामुळे त्यातील तपशील लक्षात नाहीत पण काही गोष्टी मात्र त्यातील वेगळेपणामुळे लक्षात राहिल्या आहेत.
बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत त्यांनी हाल अपेष्टांमध्ये काढलेले बालपण, सुरुवातीला त्याच्या कलेची झालेली उपेक्षा ह्या गोष्टी आढळतात. पण रविवर्मा मात्र चांगला सधन कुटुंबातला होता. त्यांचे राजघराण्याशी संबंध होते. सुरुवातीपासूनच त्याच्या कलेची कदर करणारे लोक त्याला भेटले. राजा हा किताब रविवर्म्याला अगदी लहानपणीच एका संस्थानिकाने (कोणत्या ते आठवत नाही!) दिलेला आहे. पुढे तर त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. सयाजीराव गायकवाडांसारख्या गुणग्राहक राजाने त्याला आपल्याकडे बोलावून घेतले व राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे काढून घेतली. इतरही संस्थानिकांनी त्याच्या कलेचा अशाच रीतीने आदर केला.
आपल्या चित्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने संबंधित तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवली, ते काम करणारी माणसे मिळवली आणि स्वत: छापखाना उभारला.
त्याच्या काही चित्रांवर सनातन्यांनी कडाडून टीका केली, कोर्ट केसही केली पण त्यातून तो सन्मानपूर्वक बाहेर पडला.
एकूणच हे वेगळेपण, पूर्वीचा कालखंड, तेव्हाच्या चालीरीती आणि रणजित देसाईंची भाषा यामुळे पुस्तक नुसतेच वाचनीय नव्हे तर वाचनाचा पुरेपूर आनंद देणारे आहे.
(महाराष्ट्रीय पद्धतीने नेसलेली नऊवारी साडी सर्वात ग्रेसफुल (कादंबरीतला नेमका शब्द आठवत नाही!) दिसते असे रविवर्म्याने म्हटले आहे! त्याच्या चित्रातील स्त्रियांनीही सकच्छ पद्धतीने साडी नेसलेली दिसते. )