आपण दिलेला दुवा उघडून पाहिला. कोणताही स्क्रीन-शॉट दिसत नाही. मनोगताच्या याच पानाची मोठ्या टायपातली आवृत्ती दिसते. कृपया दुवा दुरुस्त करून द्यावा, किंवा तो तथाकथित स्क्रीन-शॉट उघडून दाखवावा.
आणखी शंका-
१. ऍ टाईप करता येईल की एॅ उमटवावा लागेल ?
२. अक्षरावरची चंद्रकोर शिरोरेषेला चिकटलेली असेल की दोघांत जाणवेल इतके अंतर असेल ? ही चंद्रकोर शिरोरेषेला समांतर असेल की तुर्की टोपीवरच्या चाँदाप्रमाणे किंवा पाकिस्तानच्या झेंड्यावरच्या चांदताऱ्यातल्या चंद्राप्रमाणे तिरपी असेल ? मल्याळीध्ये 'उ'या डोक्यावर एक तिरपी चंद्रकोर काढून अतिऱ्हस्व उ काढतात. युनिकोडने तिथूनच ही तिरपी चंद्रकोर उचलली. ही चंद्रकोर सरळ असली पाहिजे, तरच ती मराठी वाटेल.
३. हल्लीचा ख, हा 'व'ला दुगाणी झाडणाऱ्या र सारखा दिसतो. त्याच्याऐवजी संस्कृत आणि मराठीत असतो तसा 'उभट र'शेजारी 'व' असेलेला ख काढता येईल का ?
४. मराठी ल लिहिता येईल, की हिंदी ’ल’च लिहावा लागेल? असेच मराठी श आणि हिंदी श बद्दल. दोन्ही लिहिण्याची सोय हवी.
४. ऱ्हस्व ऌ लिहिता येईल का? गमभन वर पूर्वी फक्त दीर्घ ॡ होता. आता माहीत नाही.
५. दारिद्र्याला' या शब्दातला द्र्या, हा द्र ला जोडलेला पाऊण य असा काढता येईल ?
६. पाऊण य हे अक्षर स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
७. ऱ्य हा मराठी दिसेल की ' डॅश शेजारी य ' असा दिसेल ? डॅशवर शिरोरेषा नसते, पण ऱ्यावर अखंड शिरोरेषा असते. '
८. त्र ला ला वाटी जोडून काढलेला जुन्या पद्धतीचा उभ्या बांधणीचा मराठी क्र टाईप करता येईल? तो स्पष्टपणे वाचता येतो, हल्लीचा क्र आहे की क्न ते समजत नाही.
९. श्र मधला 'श' स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
१०. ऱ्हस्व इकारासाठी वेलांटी देताना ती व्यंजनातल्या शेवटच्या अक्षरापर्यंत पोचायला हवी. त्यासाठी फॉन्ट्समध्ये किमान तीन वेगवेगळे स्पॅन असलेल्या ऱ्हस्व वेलांट्या हव्यात. असे करणे शक्य होईल? पुस्तकांच्या छपाईत न्स्ट्यि मधल्या वेलांटीची सुरुवात कान्यापासून होऊन पाऊण य च्या डोक्यापर्यंत पोचलेली असते. ती तशीच संगणकावरही टाईप करता आली पाहिजे.
११. ऱ्य आणि न्य यांतले अर्धे र आणि न हे वेगळे दिसले पाहिजेत. इथे मनोगतावर दिसत नाहीत.
१२. अ, आ, अि, अी, अु. अू. अृ, अॄ, अे, अै ही बाराखडी टाईप करता आली पाहिजे. सावरकरांचे लिखाण लिहून दाखवताना गरज पडते.
१३. नुक्ता असलेल्या अक्षरांची बाराखडी लिहिणे अनेकदा जमत नाही. ते शक्य व्हावे. विशेषतः च़मच़ा लिहिताना ’च़ा’मधला नुक्ता च ऐवजी च़च्या कान्याला चिकटतो, तसे ( चा़ ) होऊ नये.
१४. विसर्ग आणि कोलन वेगळे दिसले पाहिजेत. विसर्ग हा अक्षराचा भाग असतो त्यामुळे त्याच्यावर शिरोरेषा असते, कोलनवर नसते. उदा० दुःख आणि दु:ख. पहिल्यात विसर्ग आहे, तर दुसऱ्यात कोलन., वगैरे. ( खरे तर दुःखमध्ये विसर्ग नाही. जो विसर्गासारखा दिसतो आहे, त्याला संस्कृतमध्ये जिव्हामूलीय म्हणतात. विसर्ग असता तर उच्चार दुहुख असा झाला असता. )
१५. स्वरावर रफार काढता आला पाहिजे. म्हणजे हविर्अन्न, कुर्आन, पुनर्आखणी, पुनर्उच्चार, पुनर्उभारणी, आशीर्उक्ती, पुनर्ऐक्य, निर्ऋत, नैर्ऋत्य, असले शब्द लिहिता येतील, वगैरे.