काही हरकत नाही. नवीन फॉन्ट हवाच आहे. निदान हवी तशी अक्षरे असलेला एक कॅरॅक्टर मॅप असला तरी काम भागेल. त्या मॅपमध्ये काय काय हवे ?
पाऊण य, (हा राजहंस नावाच्या फॉन्टमध्ये होता. )
'श्री'तला 'श',
त्र'ला वाटी लावलेला क्र,
त्रची नुसतीच चोच. (हीही 'राजहंस'मध्ये होती.)
दीर्घ लृ,
सावरकरी 'र', तिरप्या रेघेला मध्याच्या खाली डाव्या बाजूला स्वरदंड जोडून काढलेला 'र', काकपाद किंवा हंसपाद चिन्हासारखा दिसणारा ट-ठ-ड-ढ-छ यांब्ना जोडायचा 'र'
ज्याला २००९ च्या सरकारी परिपत्रकात काकपद म्हटले ते कॅरेट नावाचे काकपाद (हंसपाद) चिन्ह). हे टाईप केल्यावर दोन अक्षरांच्या मध्ये तळाशी उमटले पाहिजे.
पायमोडके अ् आणि उ्,
जर्मन 'यू उमलॉट' (Ü) चा उच्चार दाखवणारे मराठी अक्षर -स्वरदंड नसलेल्या अर्ध्या अ ला जोडलेला यू
ऱ्हस्व ए, ऱ्हस्व ओ,
ऋकार आणि रफार (रेफ) या चिन्हांसकट सर्व (खाली वर्तुळ नसलेली) विरामचिन्हे,
साहेब, शुद्ध आदी शब्दांचे लघुचिन्ह (सोा, शुा, वगैरे),
आद्याक्षरांपुढे हल्ली पूर्णविराम देतात त्याऐवजी पूर्वी काढत असत ते छोटे शून्य ( ॰ ),
ॐ चे चिन्ह,
'ह'च्या पोटात न, व, ण, ल, तिरप्या रेघेचा 'र' आदी लिहून काढलेली संस्कृत जोडाक्षरे,
स्पोर्ट्स लिहिण्यासाठी र्ट च्या खाली लिहिलेला 'स',
ट. ठ. ड. ढ. छ आदी अक्षरांचे द्वित्त करण्यासाठी त्यांच्या खाली लिहिलेली अनुक्रमे तीच मुळाक्षरे
ट. ठ. ड. ढ. छ आदी अक्षरांना खालच्या बाजूला जोडलेली व, स आदी अक्षरे,
फ़ॅन्सी आदी शब्द लिहिण्याची सोय. (मनोगतावर निव्वळ कळफलक वापरून हा शब्द लिहिता येत नाही)
नुक्तायुक्त अक्षरांच्या बाराखड्या आणि जोडाक्षरे
'क' आणि 'फ' च्या उजव्या वाट्या. यांतली 'फ'ची वाटी 'भ'ला जोडून हिंदी झ काढता येईल.
हिंदी ण ( एा )
हिंदी क्ष. (हा ज्ञ सारखा दिसतो. ज्ञ मध्ये आडव्या रेघेला /र/ जोडला आहे, क्षमध्ये 'द' जोडलेला असतो.
एकाहून अधिक कमी जास्त रुंदी (स्पॅन) असलेल्या ऱ्हस्व मात्रा (राजहंसमध्ये अशा दोन ऱ्हस्व मात्रा होत्या. )
नॉरदॅम्टन हा शब्द दॅ वर रफार देऊन लिहिता येत नाही, त्यासाठी रफार चिन्हाच्या पोटात चंद्र काढायची सोय हवी. असले तयार अक्षर कॅरॅक्टर मॅपमध्ये असले की काम भागेल.
माझ्याकडे राजहंस फॉन्ट आहे, पण तो फ्लॉपीमध्ये असल्याने आधुनिक संगणकांवर वापरता येत नाही.
महाराष्ट्र सरकारया या २००९च्या परिपत्रकाआधी एक परिपत्रक होते. त्याची लिंक माझ्याकडे आहे, पण दुर्दैवाने ती उघडता आली नाही. त्या परिपत्रकात 'ख' चा उल्लेख नव्हता, असे मला आठवते आहे. ह्या 'व'च्या पेकाटात मागच्या मागे लाथ घालणारा 'र' असलेल्या 'ख'चा स्वीकार
करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने खूप खळखळ केली होती, हे मी आधीच लिहिले
आहे. त्यामुळे आपल्या नवीन फॉन्टमध्ये जुना 'ख' हवाच हवा. ह्या नवीन 'ख'ला तिरप्या रेघेचा 'र' जोडणे जड जाते. त्यामुळे ख्रिश्चन आदी शब्द नीट दिसत नाहीत. ज्या कारणासाठी आपल्या पूर्वजांनी 'क'ला तिरप्या रेघेचा 'र' जोडायची मनाई केली होती, त्या कारणासाठी खाली गोल वाटी असलेल्या शब्दांना तसला 'र' जोडू नये अशी व्यवस्था केली होती. म्हणून ट्र, ड्र, छ्र आदी अक्षरे बनली. 'ख्र' मध्ये जर नवीन ख असेल तर त्यालाही कॅरेट जोडायला हवे होते..
आधी लिहिल्याप्रमाणे क चा स्वरदंड आखुड असेल तर 'क'च्या वाट्या अक्षरांच्या तळाला जवळजवळ टेकतात आणि तसला 'क' हा आखुड पायाच्या आणि लठ्ठ पोट आणि लठ्ठ पार्श्वभाग असलेल्या यक्षासारखा दिसतो. हिंदी अक्षरे लांबी रुंदी सारखी असलेल्या चौरसात बसणारी असल्याने, हिंदी पुस्तकांत हा बुटका यक्ष हमखास भेटतो. मराठी अक्षरे उभट असल्याने आपला क त्या मानाने उंचापुरा असतो.
मुळाक्षरांत ऍ आणि ऑ ची जागा ए आणि ओ या पुढे असावी असा मुळात दिल्लीचा आदेश होता. महाराष्ट्र सरकारने तो शिरसावंद्य केला असला तो मला तो मान्य नाही. ऍ आणि ऑ ची जागा अनुक्रमे अ आणि आ च्या पुढे असावी असे मला वाटते. तसे केले तरच कंप, कप, आणि कॅप हे शब्द जवळपास येतील. सरकारी आदेश मानला तर कॅप हा शब्द शब्दकोशात केपनंतर येईल. हे उचित नाही.
अनुस्वार स्वरादीच असतो असे मानणेही योग्य नाही. उदा० 'टपालहंशील'मधील अनुस्वार स्वरादी नाही. 'हं'चा उच्चार करताना आधी अनुस्वाराचा आणि मग स्वराचा उच्चार होतो. शब्दकोशात शब्द घेताना अक्षर, अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर एकसमान मानले पाहिजे. मोल्सवर्थ-कॅन्डीने असेच केले आहे. असे केले की तें (=इट्) आणि ते (=दे) हे शब्द जवळ येतील, आणि मध्ये कुणी तेंडुलकर घुसणार नाही. असे केल्यानेच कांहीं, कांही, आणि काही हे शब्द एका रांगेत येतील. महाराष्ट्र सरकारमध्ये सगळेच शहाणे बसले आहेत असे नाही.