लेख वाचला आणि वाचला नसता तर बरे झाले असते असे वाटले! ह्यात दोष माझाच आहे. मी (आणि माझ्यासारखे इतरही काही) असामान्य कलावंत हाही माणूस असतो आणि सामान्य माणसासारखाच तो गुणदोषांनी युक्त असतो हे पचवू शकत नाहीत. त्यामुळेच हे वाचून भीमसेन जोशींबद्दलच्या आत्यंतिक आदराला तडा गेल्यासारखे वाटले. काही वर्षांपूर्वी ’टेलिग्राफ’मध्ये एक लेख आला होता: "व्हाय सेलिब्रिटिज कान्ट बी गुड स्पाउसेस". सेलिब्रिटिज मध्ये अमर्त्य सेन आणि पंडित रविशंकर यांचा समावेश होता. बाकी कोण कोण होते हे आठवत नाही. तसेच ’बापलेकी’ ह्या पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस यांनी संकलित/ संपादित केलेल्या पुस्तकात प्रा.लीला पाटील ह्यांचा ’लेकीचे प्रश्नोपनिषद’ हा लेख वाचला होता. लीला पाटील ह्या ना.सी.फडके ह्यांच्या प्रथम पत्नीच्या कन्या. तुमचा लेख वाचल्यावर सर्वप्रथम लीला पाटील ह्यांचीच आठवण झाली. अर्थात अमर्त्य सेन, रविशंकर आणि ना.सी. फडके यांचाबद्दल आदर असला तरी तो आत्यंतिक नसल्याने धक्का बसला तरी खूप मनस्ताप झाला नाही. इथे मात्र तसे झाले आणि आपल्यातच कलावंत आणि माणूस वेगवेगळे ठेवण्याइतकी प्रगल्भता नाही हे जाणवले!