शंकराच्या पिंडीवर दूध ओतणे हे कर्मकांडच. पण त्यामुळे आपण 'शंकर' ह्या दैवताची सेवा करतो असे मानणे, किंवा ह्या कर्मकांडाद्वारे शंकर भगवान संतुष्ट होतील आणि वाञ्छितफल मिळेल असे मानणे ही अंधश्रद्धा.

माझा मुलगा जर सकाळी दूध पिताना खूप वेळ लावतो किंवा अभ्यास करण्याऐवजी टीवी पाहात बसतो, वेळेचा योग्य वापर करीत नाही, तर मी त्याला सुरुवातीला सौम्य आणि नंतर थोडी कडक समज देणारच. कदाचित थोडी शिक्षाही करीन. त्यावर जर तो मुलगा असा युक्तिवाद करू लागला, की शेजारचा बंड्या दिवसभर उनाडतो, त्याला  तू (किंवा हवे तर त्याचे बाबा असे म्हणा) का नाही रागवत? मलाच का म्हणून तुम्ही रागवता?  तर हा युक्तिवाद योग्य आहे का? काही जण असेही म्हणतील की यामुळे इतर कोणाला त्रास होत नाहीय ना, मग वागू दे की त्याला त्याच्या मनासारखे; तर यावर उत्तर असे की तो अविकसित बुद्धीचा, बालबुद्धीचा आहे. ज्यांच्याकडे प्रगल्भता आहे, त्यांनी त्याला समजावणे योग्य आहे.

सर्वच धर्मांतील धर्मसुधारकांना अनन्वित छळ आणि टीकेला सामोरे जावे लागले आहे. याचे कारण ते नेहमीच काळाच्या पुढे असतात. त्यांचे विचार आणि कळकळ अनेक वर्षांनंतर, अनेक पिढ्यांनंतर लोकांना पटतात आणि आचरणात आणले जातात.

गेल्या शतकातल्या महाराष्ट्रापुरते पाहायचे तर  आगरकर, कर्वे, समाजस्वास्थ्यकार र. धों कर्वे, नरेंद्र दाभोलकर, राजारामशास्त्री भागवत यांना मानहानी, अवहेलना आणि उपेक्षा सोसावी लागली. त्या आधीच्या काळात सावित्रीबाईंवर लोकांनी शेणसडे ओतले. पण आज त्यांचे कर्तृत्व समाजमान्य आहे. दाभोलकर फारच अलीकडचे, समाजाकडून त्यांच्या स्वीकृतीला थोडा वेळ लागेल पण ती होईलच होईल.