देवनागरी - मोडी असे लिप्यंतर अगदीच किंचित होईल. शून्यच म्हणाना.
देवनागरी आणि इतर बऱ्याच भारतीय लिप्या यांच्याबाबत हेच म्हणता येईल.(उदा देवनागरी-गुजराती)
खरेतर देवनागरी-मोडी ह्यात फक्त अक्षरवळणाचाच (फाँट) फरक आहे; बाकी देवनागरी - मोडी एकास एक अक्षर ठेवता येईल असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

शिवाय लिप्यंतरासाठी मूळ मजकूर (मजकुराचे स्वरूपात) संगणकावर असायला/लिहायला हवा.

त्यामुळे ही अडचण लिप्यंतराची आहे असे म्हणता येईल असे वाटत नाही.

मुळात मोडी वाचून ती एकतर हाताने देवनागरी लिप्यंतरित करायची किंवा मोडी पानांची यांत्रिक छाननी करून त्याच्या प्रतिमा तयार करायच्या. अश्या प्रतिमांचे वाचन करून प्रकाशीय अक्षरओळखीने (ओसीआर = ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्नेशन) करून त्यांचे मजकुरात रूपांतर करायचे. (हे रूपांतर थेट देवनागरीत करता येईल. ) मात्र  प्रकाशीय अक्षरओळख हे अत्यंत चिकाटीचे काम आहे. एकेक अक्षर कसे ओळखायचे ते संगणकाला शिकवावे लागते. त्यासाठी मोडी येणारी माणसे हवीत. ते ते पान आणि तयार झालेला मजकूर स्वतः वाचून त्यातल्या चुका सुधाराव्या लागतात आणि त्याच वेळी संगणकाला अवगत असलेल्या तर्कातही ते ते फरक करीत जावे लागते.

देवनागरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रकाशीय अक्षरओळखीचे यश आता पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत आहे असे वाटते. (तेही मूळ छापखान्यात मुद्रित झालेल्या देवनागरी पुस्तकांसाठी असावे. ) हाताने लिहिलेला मजकूर (देवनागरी, मोडी वगैरे) प्रकाशीय अक्षरओळखीने यशस्वी रीत्या वाचायचे प्रमाण किती असेल कोण जाणे.

खरे तर मोडी ही देवनागरीच आहे ना?
माझ्या आठवणीप्रमाणे देवनागरी दोन प्रकारे लिहिता येते. देवनागरी-मोडी आणि देवनागरी-बाळबोध (जी सध्या आपण लिहितो) मला वाटते पूर्वीच्या काळी लहानपणी प्रथम देवनागरी-बाळबोधच शिकवीत. मोठे झाल्यावर हिशेब, कागदपत्रे लिहिण्यासाठी मोडी वापरली जात असावी.

हे खरे तर रोमनच्या तिसऱ्या आणि चौथ्या लिपीसारखे आहे. रोमनची दुसरी आणि चौथी लिपी जशी एकास एक आहे; फक्त अक्षरे लिहायची पद्धत वेगळी (प्रवाही किंवा जोडलेली)