खर तर माझ्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा च असते. अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखे आहे. काही अंधश्रद्धा जगायला उपयोगी पडतात. मेंदुच्या मनात या पुस्तकात अंधश्रद्धा व मेंदु विज्ञान नावाचे प्रकरण आहे. लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.