मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॉ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."