अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी
त्यांना समजून घेतले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मुलन करताना क्रोधा पेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध
व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे
त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे
ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने
मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात
निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही
लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना
काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी
भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची
असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना
अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित
होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु
मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी
मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो
ते लोक समाजात मिसळून काम करणार्या अॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला
वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अॅक्टीव्हिस्ट
हस्तिदंती मनोर्यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून
राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात
कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव
केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक
ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना
दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा
स्वतःला बदलतात असे दिसून येते.