माझ्यासाठी चहा म्हणजे सवाष्णीचं कुंकू आहे. मी चहाला कधीही नाही म्हणत नाही. लग्नानंतर मात्र पतिराजांच्या कॉफीच्या आवडीमुळे सोय म्हणून कॉफी(ही) प्यायला लागले. यथावकाश चांगल्या ब्रँडची, चिकोरी नसलेली फिल्टर कॉफी आणि तिचा सुगंध मनापासून आवडायला लागला. तशी मला गाण्याच्या घरगुती कार्यक्रमातली  जायफळ, वेलची घातलेली कॉफीही आवडते.

आलेले पाहुणे ग्रीन टी घेणार असतील तर मला बरे वाटते कारण ते कप विसळायला त्रास कमी पडतो.

अमृततुल्य चहा म्हणजे प्रत्येक गोष्ट अत्याधिक. भरपूर साखर, भरपूर चहा, भरपूर दूध आणि भरपूर उकळलेला दाट चहा. आमच्या परिचयातील एका गृहस्थांनी एका हाटेलात चहा मागवला. तो अमृततुल्य चहा पाहून ते पोऱ्याला 'दोन पुऱ्या आण' असे म्हणाले.