या आजकालच्या चटोर मुलींना असे चमकावण्याची गरज होतीच!
मुळात स्त्रीजात हीच दुय्यम असल्याचे कसे बरे लोकांना कळत नाही?
एक लाख रुपयांचे उदाहरण अगदी चपखल आहे. हे एक लाख रुपये म्हणजे अब्रू. स्त्री जन्माला येतानाच हे डबोले घेऊन येते. ते नवऱ्याखेरीज कुणी इतर लुटू नये म्हणून अपार कष्ट करणे हेच तिचे प्राक्तन. तिचा नवरा पुरुष असल्याने श्रेष्ठ असतो. त्यामुळे तो इतर कुणाचे लाख रुपये लुटायला मोकळा.
टाचही न दाखवणाऱ्या वेषभूषेचा सगळीकडे प्रसार व्हायला हवा. एकविसाव्या शतकात अशी गरज भासेल याची जाणीव झालेल्या कुण्या द्रष्ट्या व्यक्तीने हजारेक वर्षांपूर्वीच मध्यपूर्व आशियात बुरखा नामक वस्त्रप्रकार पुढे आणला. आता फक्त तो इथे रुजवला की झाले. टाचही दिसायला नको आणि नाकही.
कायदा सुव्यवस्थेसाठी अमेरिकेचे (त्यातही शिकागोचे) नाव आदराने घेतले जाते हे आतापर्यंत माहीत नव्हते. मी किती अज्ञानी होतो हे जाणवून ते अज्ञान दूर झाल्यामुळे भारावून गेलो.
सारांशः स्त्रियांनो, आपले लाख रुपयांचे डबोली सुरक्षित ठेवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करा. पण ते डबोले गमवायची वेळ आलीच तर "प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका" हे लक्षात ठेवा. आता डबोले लुटणाऱ्यानेच तुमचे प्राणही हरण केले तर गोष्ट वेगळी.