प्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल मी फार आभारी आहे. बऱ्याच दिवसांनंतर तुमचा प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटलं. असो. माझं उत्तर खालीलप्रमाणे आहे. :
एकदा का चिकित्सा करण्याची सवय लागली की ती जात नाही. त्याला पूरक माझी सरकारी नोकरी आणि घरचं चिकित्सक वातावरण हे पण जबाबदार आहे. त्याच बरोबर माझी स्वतः गोष्टी बनवून सांगण्याची लहानपणापासूनच्या सवयीचीही त्यात भर पडली. फक्त लिहिण्याची संधी उशिरा मिळाली आणि इच्छाही उशिरा झाली. ते केवळ माझ्या मोठ्या बंधूंच्या आग्रहाने झाले. नाहीतर मी माझे अनुभव गोष्टी रुपात कधीच आणले नसते. मी प्रसंगांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यासारखा वाटतो असं आपण लिहिता, यातच माझ्या लिखाणाचं मी यश समजतो. मानसिक गुंतागुंतीची वर्णने ही, दुसऱ्या माणसाच्या वागणुकीचा उपहास न करता जर उहापोह केला तर बरोबर समजते, असे मला वाटतं. आणि रंगवून गोष्टी सांगणं ही तर माझी जुनी सवय आहे. तिचाही उपयोग होतोच. तसच सर्व खात्यांमध्ये बढती , बदली, दैनंदिन कामकाज, आकसपूर्ण वागणुक आणि इतर सगळे व्यवहार याबाबत असलेली मानसिकता थोड्या फार फरकाने सारखीच असते, असं माझं निरिक्षण आहे, म्हणून बारकावे लिहिणं कठीण गेलं नाही. माणूस हा अप्रगट इच्छांचं एक भेंडोळं आहे आणि त्यात काहीही सापडू शकतं , कारण मनाला मर्यादा नाहीत. तसच अशा गोष्टींचं रूपही विविध रंगी आहे. रंगाची निवड तुम्हाला करायची असते, जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे, अशी माझी कल्पना आहे. म्हणून तर तिथे कल्पनेला वाव आहे.
निवृत्त सरकारी नोकर असल्याने मी माझ्या कामांबद्दल लिहिणे अनुचित ठरेल, म्हणून जास्त लिहीणार नाही. पण माणसं आणि ठिकाणं यांच्या वर्णनावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की मला कुठे कुठे फिरावं लागलं असेल ते. मुंबई म्हणजे सगळ्याच
गोष्टींचं आगर आहे. हे सांगायची गरज नाही. यावर लिहावं तेवढं थोडं आहे. कदाचीत व्यक्तिगत भेटीत आपल्याशी सविस्तर बोलता येईलही.
कधी ठाण्याला तर मला अवश्य भेटा. आनंद होईल. माझ्या सगळ्या गोष्टींचा "कंगोरे" या नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे व तो महत्त्वाच्या दुकानात उपलब्ध आहे. असो. प्रतिसादाबद्दल आभार.