जर श्री. सदानंद मोरे यांचे वाक्य 'वारकरी संप्रदायाचे साहित्य हेच खरे प्रातिनिधिक साहित्य' असे असेल तर काही अंशी ते खरे आहे. वारकरी संप्रदायाने सर्व समाजाला कवेत घेतले म्हणून वारकरी साहित्य हे सर्व समाजाचे प्रातिनिधिक साहित्य ठरते.
श्री. कांदळकर यांचा मुद्दा या संदर्भात पटण्यासारखा आहे.
आधुनिक मराठी साहित्याचा काळ फारच अल्प आहे त्यामुळे त्याचे योग्य ते मूल्यमापन होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल हेही श्री. पाटणकरांचे म्हणणे पटण्याजोगे आहे.
आधुनिक मराठी साहित्यात बहुजनांचे भावविश्व शिक्षण सार्वत्रिक झाल्यावरच उमटू लागले हेही ढोबळमानाने खरे आहे.
'ओल्ड मॅन अँड द सी' सारख्या (त्या तोडीच्या असे नव्हे) श्रमजीवी वर्गाची मूल्ये आणि संघर्ष व्यक्त करणाऱ्या कादंबऱ्या भारतीय भाषांबाबतच्या काही सामाजिक वास्तवामुळे या भाषांत निर्माण होऊ शकल्या नाहीत, असे मला वाटते.
किंबहुना, अजूनही, खूप मोठ्या लोकसमूहाची राहणी, खाणे-पिणे, रीतीभाती, श्रद्धा, मानसिकता, समजुती,संज्ञाप्रवाह यांचे प्रतिबिंब मराठी साहित्यात पुरेश्या प्रमाणात उमटत नाहीय.