परीक्षण नेहमीप्रमाणे आवडले.
चित्रपट मात्र थोडाफार आवडला. अमिताभ लक्ष्यात राहातो याला कारण बहुतेक दृश्ये अमिताभकेंद्री आहेत. दीपिकाला अधिक वाव मिळायला हवा होता. तिची भूमिका स्थापित करण्यासाठी तरी (कॅरॅक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी) तिला अधिक फुटेज हवे होते. शिवाय तिची उपस्थिती नेत्रसुखद आहे आणि वावर अगदी सहज. पडद्यावर सतत अमिताभ यांना बघावे लागण्यापेक्षा (तेही कमोड, खुर्ची इ. साहित्यासकट) दीपिका चालली असती. दीपिका-इरफानचे डोळ्यांचे खेळ (डोळाडोळी म्हणूया का? ) छान होते. (अर्थात मागच्या सीटवरून किलकिल्या डोळ्यांनी यांची नेत्रपल्लवी हेरणारा अमिताभ सुपर्बच. ) दीपिकाला बंगाली आघातांचे इंग्लिश बोलायला लावलेले नाही कारण ती दिल्लीत राहाणारी (बहुधा कॉन्वेंट शिक्षित) मुलगी दाखवली आहे. अमिताभचे दारू पिणे आणि तमाशा करणे हा प्रसंग अनावश्यक वाटला. त्यात परत दीपिकाच्या मित्रांसोबतच्या संबंधांचे उघड उल्लेख खूपच खटकले. कितीही बुद्धिमान, विक्षिप्त, खडूस आणि बंगाली बाप असला म्हणून काय झाले!
चित्रपट खूपश्या तपशिलांनी ठासून भरलेला असल्याने मेंदूला काम देऊन तणावाखाली बघावा लागला. तपशील चुकू नयेत म्हणून.
मुळात कथा नव्हतीच. एक प्रवास आणि त्यात घडणाऱ्या घटना इतकाच जीव असलेला हा चित्रपट. धावत्या आगगाडीच्या खिडकीतून पाहाताना जशी अतिशय सुंदर दृश्ये भराभर डोळ्यांसमोरून सरकत जातात आणि एकंदरीत छान वाटते, तसाच परिणाम हा चित्रपट देतो. त्याचे उद्दिष्टही तेच असावे.