सुरेख गझल आहे. (द्विपदी म्हणणे म्हणजे उगीचच 'अग्निरथविश्रामधामकिंचितगमनागमनसूचकताम्रलोहदंडिका' वगैरे वाटते! ) 'किती देखणा सापळा लागला' या देखण्या ओळीला अनुल्लेखाने मरण्याचे भाग्य का लाभले आहे कुणास ठाऊक. असो. फार आवडली.
अशा रचनांचा एक दोष असा असतो की (माझ्यासारखा) कुणीही सोम्यागोम्या अशा रचनांमध्ये आपल्या दुरुस्त्यांची भर घालू लागतो. (सोम्यागोम्या हे विशेषण फक्त माझ्यासाठीच राखीव आहे याची कृपया नोंद घ्यावी). आता हेच बघा ना, 'लागला' या क्रियपदाच्या जागी 'लागलेला' असा बदल करून (शब्द एखाद्या रत्नासारखा हातात घेऊन फिरवून, एखाद्य कासवासारखा उलटून त्याच्या मागचा मऊ, हळुवार अर्थ पाहून वगैरे.. ) ही गझल कशी होईल हे बघण्याचा 'तरीही कसा मला मोह झाला? '
तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागलेला
नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागलेला
नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागलेला
मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागलेला
उभय चेहर्यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागलेला
युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागलेला?
उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागलेला
त्यातून साध्या वर्तमानाच्या जागी चालू वर्तमान केल्याने गझलेतील सल अविरत राहते वगैरे निष्कर्ष काढायलाही आम्ही मोकळे असतो. पण ते असो.