खरे तर विश्वास पाटील यांच्यासारखे लेखक ग्रामीण भागातील
गरिबीविषयी झाडाझडती, पांगिरा सारख्या पुस्तकांतून भरभरून लिहितात आणि
वाचकांना त्यांचे डोळे भरभरून अश्रू वाहायला भाग पाडतात. परंतु विनोदी
लेखक द. मा. मिरासदार वाचकांना हसविण्यासोबतच ग्रामीण भागातील गरिबीमागचे
खरे कारण सांगतात. त्यांच्या कथांमधील ग्रामीण पात्रे कितीही महत्त्वाचे काम
असले तरी ते सोडून अगदी अनोळखी गावकऱ्यांनीही "राम राम पाव्हणं" म्हणत हाक
मारली की पारावर बसून, तंबाखूची चंची सोडत तास दोन तास गप्पा हाणल्याशिवाय
पुढे जात नाहीत. "निरोप" या त्यांच्या कथेत एका महिलेच्या
प्रसृतीवेदनांतून तिची सुटका करण्याकरिता तालुक्याच्या गावी जाऊन महिला
डॉक्टरला बोलावण्या करिता धाडलेला निरोप पोचविणारी व्यक्ती एकतर स्वतः ते
काम करीत नाहीच, दुसऱ्याला सांगते, दुसरी तिसऱ्याला आणि तिसरी चौथ्याला असा
त्या निरोपाचा प्रवास होतो आणि शिवाय प्रत्येक व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर
गावकऱ्यांसोबत दोन चार तास गप्पा मारण्यात घालवून तो निरोप दोन दिवस उशीराने आणि चुकीच्या व्यक्तीस चुकीच्या पद्धतीने मिळतो.