पद, अधिकार,  शासन हे समानार्थी शब्द आहेत?  खरे तर भाषेत तंतोतंत समान अर्थ असणारे शब्द क्वचितच असतात. एका शब्दाऐवजी प्रत्येक ठिकाणी दुसरा शब्द वापरणे शक्य असेल तरच ते दोन शब्द समानार्थी आहेत असे म्हणता येतील.  पहिल्या शब्दाचे जितके अर्थ असतील ते सर्व आणि तितकेच अर्थ दुसऱ्या शब्दाचे असणे,  आणि त्यांचा वापरही एकाच पद्धतीचा असणे,  ही गोष्ट जवळपास अशक्य आहे.

त्यामुळे सिनॉनिम या शब्दाचे समानार्थी हे भाषांतर तितकेसे अचूक नाही.  समानार्थी म्हणण्यापेक्षा पर्यायी शब्द म्हणणे थोडेफार बरोबर आहे. समांतर अर्थाचा शब्द, समान आशयाचा शब्द  किंवा तसम अर्थाचा शब्द असा काहीसा बोध सिनॉनिम या शब्दाने होतो.  

इंग्रजीतील रॉजे किंवा ऑक्सफर्ड या थेसॉरसांच्या  प्रस्तावनेत 'इंग्रजी भाषेमधले दोन शब्द क्वचितच अदलाबदली करण्यासारखे असतात', हे वाक्य असतेच असते. (सेल्डम इन इंग्लिश,  टू वर्ड्‌ज  आर इंटरचेंजेबल).  

पद=पाऊल,  गीत, नोकरशाहीतील उतरंडीवरचे स्थान,  हुद्दा,  दर्जा,  गणिती संख्येच्या रचनेमधली जागा , पदणे या धातूचे आज्ञार्थी द्वितीय पुरुषी  एकवचनी रूप,  वगैरे.   अधिकार आणि शासन हे फारच ओढून ताणून लावलेले अर्थ वाटतात.