अधिकार शब्द मी एक उदाहरण म्हणून दिला होता. पद आणि शासन हे शब्द समानार्थी आहेत असा माझा दावा नाही. हे उदाहरण मी प्रा. य. ना. वालावलकर यांच्या "समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश" या पुस्तकातून घेतले आहे. हे पुस्तक बुकगंगा च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

समानार्थी शब्द न म्हणता पर्यायी शब्द म्हणण्याची आपली सूचना चांगली आहे. असे पर्यायी / समानार्थी / संबंधित शब्द लेखकाला राईट क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याविषयी हा लेख आहे. नुसते पर्यायी शब्द नव्हे तर एकाच कॅटेगरीतली शब्द यात उपलब्ध करून देता येतील. उदाहरण म्हणून मी मूळ लेखात शेळी, मेंढी, गाढव असे शब्द घेतले आहेत. त्याचबरोबर इंग्रजी शब्दांना राईट क्लिकवर प्रतिशब्द उपलब्ध करून देता येतील. अनेकदा लेखनाच्या भरात इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधत बसायला वेळ नसतो. विचार केला तर आठवेलही, पण लेखनाची लिंक तुटेल म्हणून तसेच रेटून लिहिले जाते. गुगलमध्ये शोधले तर काही वेळा उपयोग होतो तर काही वेळा हास्यास्पद शब्द मिळतात. उदा "केटेगरी इन मराठी" असे गूगलमध्ये (इंग्रजीत) लिहिले असता श्रेणी हा शब्द मिळतो, तो थोडा बोजड वाटतो. त्याबरोबर वर्ग, विभाग आणि प्रकार असे शब्द देखील गुगल पुरवतो, त्याबद्दल गुगलचे अभिनंदन केले पाहिजे. पण या कोन्टेक्स्टमध्ये फिट बसेल असे समूह, गट, संघ, कुल असे अस्सल मराठी शब्द गुगलमध्ये येत नाहीत. ते शब्दकोशात मिळू शकतात. पण त्यासाठी शब्दकोश हाताशी घेऊन लेखन करणे स्ंगणकयुगात अनेकांना शक्य नाही. राईट क्लिकवर सर्व शब्द उपलब्ध झाले तर ती एक मोठीच सोय होईल असे मला वाटते.

मूळ लेखात दिलेली दोन नंबरची लिंक चालत नाही कारण आम्ही आता नवीन आव्रुत्ती उपलब्ध करून दिली आहे. "प्रुफींग टुल्स जी यु आय" असे गुगलमध्ये (इंग्रजीत) शोधले की पहिलीच लिंक आपल्याला या सॉफ्टवेअरपर्यंत घेऊन जाईल. हे सॉफ्टवेअर वापरून कुणीही अशी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो जी ओपन ऑफिस / लिबर ऑफीसमध्ये लेखातील चित्र क्र. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे वापरता येईल. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मात्र हे चालणार नाही कारण ही सुविधा फ्री/ ओपन सोर्स लायसन्सखाली बनविली गेली आहे.

लिबर ऑफीसमध्ये बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये मराठी स्पेल चेक आहेच. (मूळ लेखातील लिंक क्र. ३) उदा. केटेगरी असे लिहीले तर त्याखाली लाल रेघ येऊन कॅटेगरी असा पर्याय मिळतो. पण कॅटेगरी शब्दावर राईट क्लिक करून मराठी शब्द मिळत नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग करून एक सर्वसमावेशक संगणकीय कोश बनविण्याचा माझा विचार आहे. यात फक्त खाली दिल्याप्रमाणे शब्द जमा करावे लागतील.

कॅटेगरी | ८
श्रेणी
वर्ग
विभाग
समूह
गट
संघ
कुल
वंश

आता यात "वर्ग" शब्द आहेच त्यामुळे तो परत जमा करायची गरज नाही. वर्ग शब्दाला इतर ८ शब्दांचा पर्याय (कॅटेगरी या शब्दासकट) आपोआप मिळेल. आता मराठी शब्दाला इंग्रजी शब्दाचा पर्याय सुचविणे अनेकांना (विशेष करून मनोगतींना) कदाचित पटणार नाही. पण मी वर म्हटल्याप्रमाणे सामान्य लोकांना संगणकावर जलद लेखन करण्यास सहाय्यभूत होणारी सुविधा असे मर्यादित उद्दिष्ट आहे. तेव्हा याकडे एक पर्फेक्ट कोश म्हणून न बघता (गाजराची) पुंगी म्हणून बघता येईल. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाण्याची किंवा नवीन पुंगी बनविण्याची सूट आहेच.

मी मला वेळ मिळेल तसा शब्द भरणा करत आहेच. वाचकांपैकी ज्यांना ही कल्पना आवडेल त्यांनी सहाय्य केले तर हा प्रकल्प लवकर पुरा होईल म्हणून मी येथे लेख लिहीला आहे.