मी आज खूप दिवसांनी मनोगत वर आले. खूप म्हणजे खूपच. कारण आता मनोगतवर वाचनीय असं फारच थोडं साहित्य राहिलं आहे. त्यामुळे मी या वाटेला सहसा जात नाही. आज भेट दिली आणि ही कथा वाचनात आली. लेखक नवा आहे. कथा वाचताना माझ्या मनात ज्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या सगळ्या वाचकांच्या प्रतिक्रियेत आल्या आहेत. खरोखरच मी बुचकळ्यात पडले की या कथेत नेमकं काय आहे? चेतन पंडितांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती. ठीक आहे जरा विचार करून दिली असती तर कदाचित त्यांना शब्द सापडले असते. लेखकाला राग येणं स्वाभाविक आहे. पण तरीही आपण जे लिहितो ते एकदा नीट वाचायला हवं आहे.
मुळात या कथेचं नाव ' सुरुवात ' . कशाची सुरुवात? सासूच्या कटकटीची की नवऱ्याच्या बावळटपणाची की सासऱ्याच्या बोटचेप्या धोरणाची कसली नेमकी? सुरुवात कशाची शेवटही नाही या कथेला.
त्यानंतर शुद्धलेखनाच्या असंख्य चुका. ( प्रशासनाने दुरुस्त केल्यावर जर ही परिस्थिती असेल तर कठीणच आहे. प्रशासकांना एडिटिंगची टीम नक्कीच बदलावी लागेल. )
ही कथा कौटुंबिक आहे की भयकथा आहे हे कळत नाही. ना धड कौटुंबिक ना धड हॉरर. बायकोला संकटात सोडून जातो तो कसला नवरा? लग्न झालेला मुलगा, ते ही ज्याला एक मुलगी आहे तो रात्री आईच्या खोलीत झोपतो हे कल्पनेत तरी पटण्यासारखं आहे का? बरं शेवटी नेमकं त्या कीर्तीचं आणि काव्याचं काय होतं ते समजत नाही. बायकोबरोबर सात जन्म सोबत करण्याची शपथ घेणारा नवरा तिचं काय झालं हे शोधायचाही प्रयत्न करत नाही? इथे भुताटकी आहे असं मानलं तरी ते पण काही सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं नाही. ती कोण बाई येते? का येते? आधी तिथे काय झालं होतं कशाचाच पत्ता नाही. अशी शेंडा ना बुडखा कथा वाचताना आणखी कसली प्रतिक्रिया येणार?