मुळांत हें अनुस्वार अनुच्चारित होतें कां?  कोंकणांत बोलल्या जाणाऱ्या बोलींत हें अनुस्वार अजूनही उच्चारलें जातात.

१९६२ सालीं शुद्धलेखनाचे नवीन नियम आले, त्यावेळीं या तथाकथित अनुच्चारित अनुस्वारांवर गदा आली.  टंकलेखन करतांना, अक्षरांचे खिळे जुळवतांना आणि मुद्रितशोधन करतांना या अनुस्वारांमुळें  तें काम करणाऱ्याला फार जागरूक राहावे लागे.  या विशिष्ट लोकांच्या अडचणी विचारांत घेऊन हें अनुस्वार उडविण्यांत आलें.

आजच्या संगणकाच्या जमान्यांत हवें तेथें आणि हवें तितके अनुस्वार देणें सहज शक्य आहे.

बोलीभाषेनें मात्र या नियमांवर सूड उगवला.  नवीन नियमांनीं 'असें', 'दिसतें' यांसारख्या नपुंसकलिंगी शब्दांच्या अंत्याक्षरांवरचे अनुस्वार उडवले खरे, पण बोलीभाषेनें  नियमांच्या नाकावर टिच्चून त्यांतल्या मात्रा राखून अनुस्वार टिकवले.