मी इथे माझा स्वतःचा अनुभव मांडू इच्छितो. ९ जून २००९ मध्ये मी काकटी बेळगाव येथील स्टारलाईन मोटर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) म्हणून पदभार स्वीकारला. या ठिकाणी वाहनाच्या चासीसवर बसबांधणी केली जात असे. यात स्ट्रक्चरिंग, पॅनेलिंग, इलेक्ट्रीफिकेशन,पेंटिंग व फायनल असेंब्ली हे टप्पे असतात. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता व प्रॉडक्शन रेट (उत्पादकता) वाढविण्याकरिता माझी नियुक्ती झाली होती. मी कंपनीच्या आतच राहत असे. माझ्या गरजेच्या चीजवस्तू आणणे व भोजन आदी व्यवस्था याकरिता कंपनीने सेवक नियुक्त केले होते. कंपनीच्या फाटकाबाहेरही मी क्वचितच जात असे. एकही दिवस सुटी न घेता रोज सलग बारा ते चौदा तास केवळ कामावर लक्ष केंद्रित करून सुरुवातीच्या दोन महिन्यांत माझ्या देखरेखीखाली गडद निळ्या रंगाच्या खिडक्यांना जाळी लावलेल्या पोलिसांच्या बसगाड्या बनविण्यात आल्या. दोन महिन्यांत १६९ बसगाड्या म्हणजे त्या कंपनीच्या इतिहासातली फार मोठी उत्पादकता होती त्यामुळे मालक अतिशय खूश होते. खरे तर हे काम फार पूर्वीच आधीच्या महाव्यवस्थापकांनी करून घ्यायला हवे होते, परंतु वयोमानाप्रमाणे त्यांना दगदग न सोसता आल्यामुळे त्यांनी काम सोडून दिले होते. मात्र जाण्याआधीच त्यांनी सर्व जॉब कार्डांवर स्वाक्षऱ्या करून ठेवल्यामुळे मला एकाही बसच्या जॉबकार्डवर स्वाक्षरी करावी लागली नाही.
या दरम्यानच्या काळातच पुण्याहून पीएमपीएमएल चे वरिष्ठ अभियंता श्री. सुनील बुरसे हे संशोधन आणि विकास (रिसर्च ऍड डेव्हलपमेंट) विभागात बनत असलेल्या प्रोटोटाईप बसची पाहणी करण्याकरिता कंपनीत आले तेव्हा कंपनीचे मालक श्री. दिलीप चोप्रा यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. कर्नाटक राज्यात पुण्यातील व्यक्तीशी भेट झाल्यामुळे आम्हा दोघांनाही अतिशय आनंद झाला. जणू काही आमची फार जुनी ओळख असावी अशा पद्धतीने भोजनप्रसंगी आमच्या गप्पा रंगल्या. भोजनानंतर श्री. बुरसे यांनी मला बाजूला नेत सांगितले, "तुम्ही जरा आमच्या गाडीवर लक्ष ठेवा. हे लोक आमच्या गाडीत नेहमीच काहीतरी गडबड करून ठेवतात आणि सरकारी नोकर असल्याने पुण्याच्या नागरिकांना आमच्यावरच संशय येतो." त्यावर मी उत्तरलो, "बुरसे साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. ही प्रोटोटाईप आर अँड डी डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे आणि तो विभाग माझ्या नियंत्रणात येत नाही, परंतु तुमच्या पुढच्या बसेस जेव्हा प्रॉडक्शन डिपार्टमेंटमधून बाहेर पडतील तेव्हा जनरल मॅनेजर म्हणून त्यांच्या सर्व उत्पादन प्रक्रियेवर माझे नियंत्रण राहील आणि मी काही गैर घडू देणार नाही. "
त्यानंतर ऑगस्ट २००९ मध्ये दुसऱ्या आठवड्यापासून पीएमपीएमएलच्या बसेस माझ्या विभागात बांधणीकरता आल्या असता मी त्यांची कसून तपासणी केली. स्ट्रक्चरमध्ये बेस (तळाचा) करिता ३५ मिमीचा अँगल वापरला गेला असल्याचे दिसत होते आणि आराखड्यात मात्र ५० मिमीचा अँगल वापरण्याचे निर्देश दिले गेले होते. फायनल असेंब्ली होऊन जॉब कार्ड माझ्या स्वाक्षरी करिता आले तेव्हा त्यावरही ५० मिमीचा अँगल वापरल्याचे नमूद करण्यात आले होते. मी अर्थातच स्वाक्षरी करण्यास नकार देऊन हे प्रकरण मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप चोप्रा यांच्या कानावर घातले. त्यावर हे असे करावेच लागते. सरकारी कंत्राटे मिळविण्याकरिता अतिरिक्त पैसा खर्च होतो तो अशाच पद्धतीने काढावा लागतो असे उत्तर त्यांनी दिले. असे असेल तर जॉब कार्डवर तुम्हीच सही करा असे मी चोप्रांना सांगितले. त्यावर चोप्रांनी स्वाक्षरी तुम्हालाच करावी लागेल. तुम्ही जनरल मॅनेजर असताना मी स्वाक्षरी केली तर शंकास्पद दिसेल असा युक्तिवाद केला. त्यावर प्रत्यक्षात ३५ मिमीचा अँगल वापरला गेला असूनही जॉब कार्डवर ५० मिमीचा अँगल दर्शविला आहे तरीही मी सही करावी असे वाटत असल्यास आपण मला तसे डिस्क्रिपेन्सी लेटर द्या असे मी श्री. चोप्रांना सुचविले. त्यावर त्यांनी असे पत्र देण्यास नकार दिला आणि त्या कंपनीतली जनरल मॅनेजर पदाची केवळ ८६ दिवसांची कारकीर्द संपवीत मी राजीनामा देऊन २ सप्टेंबर २००९ रोजी पुण्यात माझ्या घरी परतलो.
पुढे दोनच महिन्यांनी वर्तमानपत्रात वाचनात आले की पीएमपीएमएलच्या बसेस मध्ये तांत्रिक गडबड असून त्याकरिता वरिष्ठ अभियंता श्री. सुनील बुरसे यांची खातेनिहाय चौकशी केली जात आहे. माझ्या माहितीनुसार श्री. बुरसेंचा यात काही दोष नव्हता. त्यांना मदत करावी म्हणून माझ्याजवळची माहिती त्यांना द्यावी याकरिता मी माझ्यापाशी असलेल्या त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अनेकदा संपर्क केला परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित तो कार्यालयाने दिलेला भ्रमणध्वनी असेल व त्यावेळी श्री. बुरसे यांच्या ताब्यात तो नसावा. असो. पुढे मी नाद सोडून दिला.
तेव्हा, हा मुद्दा लेखी मागणे "गैर" आहे का, कायदेशीर आहे का, असा नसून तो तुमच्या कंपनीत "व्यवहार्य" आहे का, असा आहे. ह्या श्री. चेतन पंडित यांच्या मुद्द्याशी अगदी सहमत आहे.