खर तर महाराष्ट्रात दुष्काळ असण्याचे काहीच कारण नाही. ज्या प्रदेशात फारसे जलतज्ञ नसतात, ज्यांच्याकडे दुष्काळ निवरणाचे फारसे उपाय नसतात. त्यांच्या येथे दुष्काळ पडल्यास ते एकवेळ समजू शकते. पण महराष्ट्रात? 

आपल्या कडे अनेक थोर व्यक्तींनी, संतांनी पाणी बचतीचा संदेश शतकानू शतके दिला आहे. तो आपण मनावर घेत नाही, ते निराळे. "पाणी अडवा पाणी जिरवा" मोहीम कैक वर्षां पासून आहे. बहुतेक भूभाग खडकाळ असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही, पण मोहिम तर आहे ना? अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे  जल संवर्धनाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. आता राळेगण सिद्धी येथे ५०% पेक्षा जास्त पाणी कुकडी धरणाच्या कालव्यातून लिफ्ट पद्धतीने उचलले जाते, व तरी सुद्धा अण्णा "धरण म्हणजे मरण" अशी घोषणा देतात त्या कडे लक्ष देऊ नये. त्यांनी जल संवर्धनाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला या कडेच फक्त लक्ष द्यावे. हिवरे बाझार येथे तर पोपटराव पवार यांनी जे काही केले ते निव्वळ चमत्कारच आहे.  आता इतक्या वर्षां नंतर पण ते मॉडेल हिवारे बाझार पुरतेच मर्यादित का आहे, असा (वाह्यात)  प्रश्न विचारू नये. केटी (कोल्हापूर टाईप) वीयर तर अनंत झाले. सगळे कोरडे ठणीत पडले आहेत. पण आहेत ना? 

हल्ली एकाच वेळी सात उपाय करण्यात येत आहेत. १- सुरेश खानापूरकर यांचे शिरपूर मॉडेल; २-सरकारचे "जलयुक्त शिवार मॉडेल"; म्हणजे काय ते नक्की माहीत नाही. पण काहीतरी आहे  नक्कीच. ३- नाले-रुंदीकरण खोलीकरण मॉडेल (याचा जनक कोण ते माहीत नाही)  ४- लातूरचे रेल्वे-टँकर मॉडेल.  ५- वर्षातून एक दिवस दोन तासां करता "जागतिक जल दिन" साजरा करणे. म्हणजे भाषणबाजी. तेच ते वक्ते आणि त्यांची तीच ती भाषणे. पण वर्षातून तब्बल दोन तास. हे काय थोडके झाले? ६- पाच नद्यांचे पाणी कलषांत ठेवून त्या कलषाची पालकीतून वाजत गाजत - पैठणी  साड्या नेसून व स्वछ परीट घडीचे कुडते-पायजमे घालून, मिरवणूक काढणे. ७-शाळेतील मुलांना पा-णी- वा-च-वा अशी अक्षरे दिसतील असे उभे करून त्याचा उंचा वरून फोटो काढणे व तो फोटो दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात छापून आणणे . 

या शिवाय महिन्या भरातून  एकदा "आंतर राष्ट्रीय ख्यातीचे जल तद्नय" राजेंद्र सिंग यांची एक तरी फेरी असतेच. महाराष्ट्रा बाहेर त्यांना हल्ली कुणी फारसे विचारीत नाही म्हणून असेल कदचित, पण फेरी असतेच.  त्याच बरोबर धरण, नदी-जोड इत्यादी प्रकल्पांना विरोध करणार्यांना आपल्या कडे भलताच मान असतो. अधून मधून "इस्रायेलला जे जमले ते अपल्याला का जमू नये" असे प्रश्न विचारणारे जळजळीत अग्रलेख छापून येतच असतात. 

येवढे सगळे असताना सुद्धा महाराष्ट्रात दुष्काळ आहे म्हणता? मला नाही खरे वाटत.

चेतन पंडित