मी सैराट पाहीला नाही. पाहणार पण नाही. सेवा निवृत्ती नंतर महाराष्ट्रात स्थायिक झाल्या वर मराठी चित्रपट बघणे शक्य झाले, तेव्हां कुणाच्या तरी सांगण्या वरून काही चित्रपट पाहिले. (वळू, दे धक्का, कायद्याच बोला) व परत या फंदात पडायचे नाही असे ठरविले. असो.
आपण व पाश्चात्य संस्कृती यात काही फरक आहेत त्यातील एक असा, कि ते काम करण्याचे वेळी ठासून काम करतात, व इतर वेळी ठासून जीवन जगतात, जीवनाचा आनंद घेतात. (वर्क हार्ड, प्ले हार्ड) आपण काम करायचे वेळी काम थोडे व इतर वायफळ बरेच काही करतो, व "जीवनाचा आनंद" घ्यायचे वेळी "झगमगते मॉल्स, मल्टीप्लेक्स, महागडे मोबाईल्स, म्हणजे काही खरा आनंद नव्हे. हा तर निव्वळ भोगवाद. " वगैरे भंकस तत्त्वज्ञान पाजळतो. त्या मुळे काम पण धड नाही व जीवनाचा आनंद पण धड नाही, अशी परीस्थिती होते. दिवसाचे २४ तास ज्वलंत समस्यांवर विचार करायचा नसतो, व दिवसाचे २४ तास प्रेमगीते पण गायची नसतात. सध्याची तरूण पिढी आपल्याला वाटते त्यापेक्षा खूपच हुशार आहे. सिनेमात दाखवण्यात येणारे प्रेम प्रगल्भ का काय म्हणतात तसे नाही - पुलंच्या शब्दात, त्यात मानवी जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सखोल व आरस्पानी दर्शन घडत नाही - हे त्यांना नीट कळते. त्यांना आपल्या सल्ल्याची गरज नाही. त्यांनी न मागितलेला सल्ला त्यांना देण्या ऐवजी आपण या वेबसाईट वर ज्वलंत समस्यांवर विचार करूया. तर काय आहेत आपल्या ज्वलंत समस्या ?
१- मराठी ही भाषा अख्ख्या विश्वाची भाषा कशी करता येईल
२- आजचे गणेशोत्सवाचे स्वरूप लोकमान्य टिळकांना अपेक्षित होते काय?
३- साहित्य सम्मेलनाची निवडणूक
४- साहित्य सम्मेलनात मंचावर राजकारण्यांना स्थान असावे का?
५- भालचंद्र नेमाडे म्हणले कि . . . . (चिरफाड करण्यास कोणतेही विधान घ्यावे)
६- श्रीपाल सबनीस म्हणले कि . . . . (चिरफाड करण्यास कोणतेही विधान घ्यावे)
मला वाटते येवढ्या ज्वलंत समस्या पुरे झाल्या.
चेतन पंडित