स्वप्नभंग...
प्रत्येक सजीव हा स्वप्न बघत असतो, अर्थातच त्याच्या उन्नतीचे... त्यातल्या त्यात माणूस हा स्वप्नांबाबत खूपच भावूक असतो, स्वप्नाळू असतो.
मीही अशीच स्वप्न बघतो... बघायचो. लहानपणी 'मोठे' होण्याची अन् मोठेपणी 'महान' होण्याची. स्वप्न बघायला काय हरकत आहे? तर मीही स्वप्न बघायचो, पण झोपेतच. जागेपणी स्वप्नं पाहिली असती तर कदाचित झालो असतो 'महान' वगैरे...
स्वप्नांचा हा विचार डोक्यात यायचं कारण म्हणजे, काल रात्री एक भयाण स्वप्न पडलं. घनदाट जंगल, मी एकटाच चाललोय... मी तिथे कसा? का? कशासाठी? माहित नाही. तर जंगलातून जात असतानाच अचानक दोन आकृत्या समोर उभ्या ठाकतात. कोण ते ओळखू शकत नाही. पण चेहरे खूपच भयानक वाटले. मी घाबराघुबरा होत हाका मारु लागतो... बऱयाच वेळानी अंगावर थापट्या पडू लागतात. भितीने दरदरुन घाम फुटलेला असतो. तसाच दचकत जागा होतो, तर 'अगं' चापट्या मारत उठवत असते. 'काय रे, काही स्वप्न पाहिलंस का? झोपेत किती ओरडत होतास?'
आता हिला काय सांगू? स्वप्नात पाहिलेल्या चेहऱयांपैकी एक चेहरा थोडाफार हिच्याचसारखा दिसत होता म्हणून.
विचार करतो, असं स्वप्न का पडावं? बायको उत्तरते,'रात्रीस खेळ... बघू नकोस. झोपत जा लवकर.
पूर्वीही खूपदा अनेक स्वप्नं पाहिलीत... पण ती किती छान असायची. पाचवी की सहावीत होतो. वर्ग मॉनिटरसाठी मॅडम माझं नाव दुसऱया दिवशी सांगणार होत्या. त्या रात्रीही पाहिलं होतं स्वप्न वर्ग मॉनटर झाल्याचं.. सकाळी शाळेत कडक इस्री केलेला युनिफॉर्म अन् वडिलांकडून धुवून घेतलेले कॅनव्हास शूज घालून दिमाखात शाळेत प्रवेश करतो. वर्ग सुरू होताच मॅडम दुसऱयाच मुलाचं नाव मॉनिटर म्हणून जाहीर करतात. राग काढणार तरी कोणावर? पीटीच्या तासाला पांढरेशुभ्र शुज आणि युनिफॉर्मची 'धुळधाण'... तो माझा पहिला स्वप्नभंग.
याच शालेयकालात अनेक स्वप्न पाहिलीत मी. अगदी शाळेतून अख्ख्या तुकडीत तिसरा वगैरे आल्याची स्वप्नंही पडायची. हो तिसराच. कारण पहिला-दुसरा येऊ शकतो याची गॅरंटी स्वप्नातही नव्हतीच. दहावीत असताना मात्र स्वप्न थोडी 'गुलाबी' होऊ लागलेली. एखादी मुलगी स्वतहून बोलते म्हणजे कोण अप्रूप. ती बोलली की त्या रात्री लगेच स्वप्नात यायची. शेवटच्या बेंचवर बसून गप्पा मारत बसल्याचं स्वप्न. छान मुडमध्ये सकाळी शाळेत जावं तर ही बया दुसऱया वर्गातल्या एका हुश्शार मुलाबरोबर व्हरांड्यात गप्पा मारत असलेली दिसायची. हा दुसरा स्वप्नभंग!
कॉलेजलाइफमध्ये मात्र खूप स्वप्न 'रंगवली'... पाहिली... अन् स्वप्नभंगही खूप जिरवलेत. बारावीच्या रिझल्टआधी कॉलेजमध्ये चक्क पहिला आल्याचं स्वप्न पडलं. 'त्या' आवडत्या मॅडमनी केलेलं 'गोड' अभिनंदन... दिलेलं गुलाबाचं फुल... भरवलेला पेढा... पण सगळं सगळं फक्त स्वप्नातच. रिझल्टच्या दिवशी कॉलेजमध्ये जाताच पहिला आलेल्या मुलाला 'त्या'च आवडत्या मॅडम पेढा भरवताना पाहिल्या.... हा आणखी एक स्वप्नभंग!
तर अशी ही गुलाबी स्वप्नं... आजही कधीकधी स्वप्नात येतात त्या मॅडम... शाळा-कॉलेजातल्या अनेक 'ती'... हातात हात घालून फिरल्याची स्वप्न पडतात अन् समोर 'अगं' झोपतून उठवत असते, अरे, उठ किती वाजले बघ? काही स्वप्न वगैरे बघतोयस की काय? इथेही पुन्हा स्वप्नभंगच....
खरंच स्वप्नांमध्येच किती रमलोय मी. मग अचानक आठवतात स्वप्न वडिलांनी-आईने जागेपणी पाहिलेली, मी कोणी मोठा ऑफिसर वगैरे होणार याची...
त्यांच्या स्वप्न-भंगाचं काय?
उत्तर मिळवायला आणखी बरीच स्वप्नं बघावी लागतील मला.... तीही जागेपणी...!
मनीष चंद्रशेखर वाघ