माझ्या निरिक्षण व अनुभवांनुसार पुढच्या भारतवारीची तजवीज म्हणून दर वेळी भारतातून बाहेर पडताना परदेशस्थ भारतीय रोख चलनात भारतीय रुपये बरोबर नेतात. यापैकी मोठ्या संख्येने भारतातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपासून अंतरावर राहणारे लोक असतात (काही तर ५०० ते ७०० किमी लांब अंतरावर देखील राहणारे असतात). भारतात लांबचा प्रवास करताना अडचण येऊ नये म्हणून पुरेशी रोख रक्कम जवळ बाळगली जाते तसेच हे धोरण असते. बरेच परदेशस्थ भारतीय दर भारतवारीच्या वेळी भारतात पोचल्यावर पहिले एखाद्या पर्यटन स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात (उदा महाराष्ट्रात राहणारे माझ्यासारखे लोक येताना नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून काश्मीरला फिरायला जातात).  

काही तांत्रिक बाबी अशाही असतात की भारतात जाण्यापूर्वी स्वतःच्या एन आर इ किंवा एन आर ओ खात्यांत रक्कम पाठवून ठेवली असली तरी त्या खात्याचे डेबिट कार्ड काही वर्षे न वापरल्यामुळे बँकेने बंद केले असते किंवा तसे झाल्याची शक्यता असते. ठरवून भारतात जाणारे या सर्व बाबी अगोदर तपासू शकतात. पण भारतात राहणाऱ्या कुटूंबियांत  कुणी अचानक गंभीर आजारी पडल्यास मिळेल त्या फ्लाईटने यावे लागू शकते. तेव्हा हे उपाय करून ठेवण्याची संधी मिळत नाही. 

उत्तर अमेरिकेतल्या घरातून भारतातल्या घरी पोचायला लागणारा एकूण काळ ४० तासांहून अधिक असू शकतो. या दरम्यान भारतातल्या विमानतळावर उतरल्यावर करन्सी एक्स्चेंजच्या काउंटरवर कमिशन देऊन भारतीय चलन विकत घ्यावेसे वाटत नाही. कदाचित या प्रकारच्या विविध शक्यतांचा विचार करूनच रिझर्व बँकेने परदेशात जाणाऱ्यांनी भारतीय चलन नेण्याची व परतताना बाळगण्याची कमाल मर्यादा ₹२५००० ठेवली असावी. (नेपाळ, भूतान, बांगलादेश व पाकिस्तान या देशांत जाणाऱ्यांचा इथे अपवाद आहे). 

मी स्वतः अन माझ्या ओळखीतले कुणीही कमाल मर्यादे एवढे किंवा अधिक रोख भारतीय चलन परदेशात बाळगताना आजवर पाहिले नाहीत.  पण कुणाकडे बंद झालेल्या नोटांपैकी केवळ ₹५०० ची नोट असली तरी त्या व्यक्तीस सोयीचा पर्याय मिळायला हवा असे मला वाटते. 

ता. क. या प्रतिसादातली सर्वच उदाहरणे प्रत्येकालाच लागू होतील असा माझा दावा नाही हे नम्रपणे नमुद करतो.