तुमचा लेख वाचून असे वाटले कि "पालकांची जबाबदारी कोणाची?" हे दुखणे, व म्हणून "मुलांनी कायम स्वरूपी परदेशी जाणे" या वर टीका, असे नसून, मुलांनी कायम स्वरूपी परदेशी जाणे, भरपूर पैसे कमावणे हे दुखणे, व त्यावर टीका करण्या करता "पालकांची जबाबदारी कोणाची?" हे निव्वळ "उकरून काढलेले" कारण. पण तसे नसल्यास असे म्हणावे लागते कि तुमच्या लेख फार उथळ आहे. खरी समस्या काय, या वर तुम्ही सखोल विचार केला आहे असे वाटत नाही. तर, आता नॉन-सर्कास्टिक विचार.
वृध्त्वाच्या ढोबळ मानाने चार अवस्था करता येतील.
१- जेव्हां तुमचे तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात.
२- दैनंदिन शौच-स्नान इत्यादी करता अजून तुमचे तुम्ही स्वतंत्र आहात. पण आता डॉक्टर कडे, बँकेत, बाजारात, आपले आपण जाता येत नाही. कोणी तरी न्यावे लागते. स्वयंपाक करता येत नाही. एकटे राहायची भीती वाटते. स्नानगृहात मी घसरून पडलो तर? तुमच्या कुटुंबियांना पण तुम्हाला एकटे ठेवण्याची भीती वाटते. स्नानगृहात तुम्ही घसरून पडलात तर?
३- मदतीने जगण्याची अवस्था. आता शौच-स्नान इत्यादी करता पण तुम्ही स्वावलंबी नाही. कदाचित अंथरुणाला खिळलेले. आता तुम्हाला २४ X ७ मदतनीस लागतो/लागते.
४. अल्झायमर, बुद्धीभ्रंश, पक्षघात, वगैरे. खर म्हणजे आता तुम्ही "तुम्ही" उरलाच नाहीत. आता उरले आहे ते फक्त शरीर. तोडावाटे अन्न आत घेऊन त्याचे विष्ठेत रुपांतर करणारे एक यंत्र.
आज पासून पन्नास वर्षे पूर्वी पर्यंत बहुतेकांचे आयुष्य अवस्था दोन मध्येच संपत असे. लहानसे आजरपण, व अनंतात विलीन होणे. मात्र आधुनिक वैद्यकाच्या प्रगती मुळे आता बहुतेक व्यक्ती अवस्था ३ पर्यंत जगतात, व अवस्था ४ मध्ये पोहोचणा-र्यांची, म्हणजे अति-वृद्ध व अति-विकलांग, संख्या पण वाढत आहे. Care-Giver हा पाश्चात्य संस्कृतीला शब्द. आपल्या समाजात व्याधीग्रस्त किंवा वार्धक्यग्रस्त यांच्याच समस्यांची दखल घेतली जाते. त्यांचा सांभाळ करणाऱ्यांच्या पण काही समस्या असतील, याची दखल घेणारे विरळाच. तुमच्या पूर्ण लेखात याची यत्किंचित पण दखल नाही. जेव्हां आई-वडील अवस्था ३ किंवा ४ मध्ये वयाची ८५ पार केलेले असतात तेव्हां त्याची काळजी घेणारा स्वतः पण वृद्धच असतो, त्याची पण साठी उलटून गेलेली असते, त्याच्या स्वतःच्याच आरोग्याच्या तक्रारी असतात. आता या अती-वृद्धांची काळजी तो कसा घेणार? या समस्यांचा विचार तुम्ही केलेला नाही.
शौच-मूत्र विसर्जन या वरचे नियंत्रण संपल्या नंतर फक्त डायपरचाच खर्च महिन्याला २००० इतका असतो. फक्त एक पाळी दाई ठेवल्यास तिचा खर्च महीन्याला १८,०००. औषधे वेगळीच. माझ्या माहीतीत अशी दोन कुटुंबे आहेत ज्यांना हे सर्व परवडत नाही म्हणून मुलगा-सून यांनीच आईला बेडपॅन देणे, स्वच्छ करणे, कॅथेटर लावणे सुद्धा केले. हे कोणालाच आवडत नव्हते, ना करणाऱ्याला, ना करून घेणाऱ्याला. पण दोघांचाही नाईलाज होता. या समस्यांचा विचार तुम्ही केलेला नाही.
तर, ज्यांची अर्थिक स्थिती अगदीच बेताची आहे, विकल-वृद्धांना सांभाळण्याचा खर्च परवडत नाही, त्यांची अवस्था फारच अगतिक असते. त्यांच्या समस्ये करता कोणा कडेच काहीही उपाय नाही. "ऑस्ट्रेलियात सरकार ज्येष्ठांची काळजी घेते. मात्र आपल्या कडे . . . ." हे पालुपद उगाळण्याचा काहीही उपयोग नाही. आपल्या कडे तसे होणे नाही. कल्याणकारी योजना राबविण्या करता देश संपन्न असावा लागतो. इथे सरकारकडे कुपोषित बालकांना डाळ-तांदुळाची खिचडी खाउ घालायला पैसे नाहीत, विकल-वृद्धांना कसे पोसणार? आणि, "जीडीपी वाढ म्हणजे विकास नव्हे" व "पैश्याने सुख विकत घेता येत नाहीत", असले "उच्च" विचार मिरविण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाने देश संपन्न होण्याची स्वप्ने पाहू पण नयेत.
या सर्व प्रश्नांवर वृद्धाश्रम हा एकमेव उपाय आहे. प्रगत देशांत ज्येष्ठांची पूर्ण जबाबदारी सरकार घेते म्हणजे नेमके काय? याचे उत्तर पण वृद्धाश्रम हेच आहे. फरक इतकाच, कि सरकार जबाबदारी घेते म्हणजे सरकारच वृद्धाश्रम किंवा तत्सम संस्था चालविते, किंवा त्याचा खर्च सरकार देते. पैसे सरकारने दिले, ज्येष्ठ व्यक्तीने स्वतः दिले, किंवा अपत्याने दिले, उपाय तोच आहे - वृद्धाश्रम. पण जरा बऱ्या वृद्धाश्रमाचा खर्च महीन्याला दरडोई ३०,००० इतका असतो. तर, आई-वडिलांची काळजी घ्यायची असेल तर मुलांनी सगळ्यात पहिले काम करावे म्हणजे भरपूर पैसे कमवावेत. जेणे करून वृद्धाश्रमाचा, औषधांचा खर्च परवडेल, आईला बेडपॅन स्वतःच देण्याची वेळ येणार नाही.
परदेशी असलेली अपत्ये जर आई वडिलांना तेथे नेण्यास तयार असतील पण आई वडिल स्वतःच तेथे जाण्यास तयार नसतील, तर तो दोष पूर्ण पणे आई वडिलांचाच आहे. माझ्या मुलाने माझ्या म्हातारपणी माझी काळजी घ्यावी येथपर्यंत अपेक्षा रास्त आहे. पण मी माझी मर्जी असेल तेथेच राहीन व मुलाने त्याचे करीयर सोडून तिथेच येवून राहावे व माझे कडे बघावे, ही अपेक्षा १००% चुकिची आहे. समाजाने या "श्रावणबाळ" मानसिकतेतून बाहेर यावे. तू आपले सगळे काय ते सोडून आम्हाला कावडीत घालून तीर्थ यात्रेला ने असे सांगणाणरे आई-वडील , व त्यांचे एकून तसे करणारा श्रावण, मला दोघांपैकी कोणाचेही कौतुक वाटत नाही.
चांगले, पूर्ण जबाबदारी घेणारे वृद्धाश्रम पाहिजेत. व त्यांचा उपयोग करून घेण्याची समाजाची तयारी पाहिजे. "पूर्ण जबाबदारी घेणारे" म्हणजे केवळ दोन वेळचे जेवण येवढेच नव्हे तर माझी औषधे व इतर गरजेच्या वस्तू बाजारातून आणणे, बँकेची कामे, माझ्या खात्यातून पैसे काढून ते वृद्धाश्रमाला देणे, माझा आयकर भरणे, वर्षाला आयकर विवरण पत्र भरणे, पेन्शन असल्यास वर्षातून एकदा लाईफ-सर्टिफिकेट करणे, सर्व काही.
या पुढे, गरज पडेल तेव्हां मला रुग्णालयात नेऊन तिथे पण माझे नातेवाईक जे काही करतील ते सर्व करणे. ही सोय परदेशी स्थायिक असणाऱ्यांना विशेष महत्वाची आहे. रहिवासी जरा आजारी पडला कि वृद्धाश्रम जर त्याच्या मुलांना फोन करून "तुम्ही ताबडतोब या व काय ते बघा" असे सांगणार असेल, तर परगावी किंवा परदेशी स्थायिक Care-Giver चे बरेच प्रश्न तसेच राहतात. दोन पाउल पुढे जावे. एक, मी वृद्धाश्रमात असताना मला जर रुग्णालयात नेण्याची गरज पडली, तर जे काही माझ्या मुलाने केले असते, तेच सर्व वृद्धाश्रमाने करावे. बिल अर्थातच आमच्या कडे. त्या करता वाटल्यास आगाऊ डिपोझिट घ्यावे. मला रुग्णालयात नेले आहे हे माझ्या मुलाला कळवावे. मग तो गरज असेल त्या प्रमाणे, व त्याच्या सोयी प्रमाणे, येण्याचे करेल. दोन, समजा नाहीच येवू शकला, तर वृद्धाश्रमाने वैकुंठ पर्यंत माझी जबाबदारी घ्यावी.
अर्थात यात एक जबाबदारी माझ्या वर पण असेल. दिवसातून दोन वेळा पाच मिनिटे अति-दक्षता विभागात येवून "बाबा, कसा आहेस" फक्त येवढे विचारण्या करता माझ्या मुलाने त्याचे सर्व काम सोडून पुण्यात येवून बसावे अशी अपेक्षा मी पण करता कामा नये. आपले आप्त परगावी निघाले कि कुठे तरी निरोप घ्यावाच लागतो. विमानतळावर आत जाता येत नाही, प्रवेश दारापाशीच निरोप घ्यावा लागतो. भारतात रेल्वे स्टेशनावर आत जाता येते, पण जागे वर बसवून दिल्या नंतर डब्या बाहेर येताना निरोप घ्यावा लागतो. तरी सुद्धा गाडीत बसवून द्यायला येणारे बहुतेक लोक गाडी सुटे पर्यंत फलाटावर तिष्ठत उभे असतात. का? पण प्रवाश्यां पैकी काही असे ही असतात कि डब्यात बसवून दिल्या नंतर स्वतःच सांगतात "आता तू गाडी सुटे पर्यंत थांबण्याची गरज नाही. निघालास तरी चालेल."
मी त्यांच्या पैकी आहे. "बाबा, तुझ्या प्रत्येक आजारपणाचे वेळी मी नाही आलो तर चालेल का?" असे माझ्या मुलाने मला विचारण्या ऐवजी मीच त्याला सांगितले आहे कि "बेटा, माझ्या प्रत्येक आजारपणाचे वेळी तू यायची गरज नाही". असे होऊ शकते कि आधी साधे वाटणारे आजारपण आकस्मिक शेवटचे निघाले व त्या नंतर आमची परत भेट होऊ शकली नाही. त्याला इलाज नाही. कुठे तरी निरोप घ्यावाच लागतो.