तुमच्या पहिल्याच प्रतिक्रियेत हे जाणवलं कि लेख तुम्ही फारच 'पर्सनल' घेतला आहे (बहुतेक). लेखात मांडलेले मुद्दे समजून घेण्याऐवजी तुम्ही उगाचच इतर गोष्टींकडे दिशा वळवत आहात.
कोणी कायमचं बाहेर जावं, पैसे कमवावे अथवा काहीही करावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नकळतेपणी उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचा हट्ट करणारे आहेत आणि सर्व काही समजून घेऊन, बाहेर शिक्षण घ्यायला जायचा विचारपूर्वक निर्णय घेणारेही ह्याच समाजात आहेत.
पैसे कमावण्यासाठी कायमचं तिकडंच राहावं लागतं असा नियम मला माहित नाही. बाहेरदेशी न जाता भारतात राहूनच श्रीमंत झालेले लोक वेडे आहेत कि काय?
पालक भोळे भाबडे आहेत कारण पाल्याचा बाहेर जाण्याचा हट्ट पुरवताना पुढील परिस्थिती न कळण्याइतके ते मूर्ख नक्कीच नाहीत.
मी आधीही म्हंटलं आहे कि लेख 'फक्त' मला काय वाटतं त्यावरून लिहिलेला नसून जी परिस्थिती बघतो आहे त्यावरून लिहिला आहे. लेखात अनेक गोष्टी लिहिल्या गेलेल्या नसल्या तरी त्यावर विचार झालेला नाही असं समजण्याची गरज नाही.
तुम्ही स्वतः बाहेर राहत असाल म्हणून (केवळ अंदाज), किंवा इतर कोणत्यातरी कारणानं कदाचित तुम्ही अशी परिस्थिती बघितली नसेल; किंवा तुम्ही अश्या परिस्थितीकडे कानाडोळा करण्यात मानसिकरित्या सक्षम आहात.
पण ह्यामुळे "प्रश्न अस्तित्वातच नाहीत" असा आव आणण्याची गरज नाही.
तुमचे मुद्दे तांत्रिक दृष्टया बरोबर 'असतील', पण ते 'आजच्या' (भारतातील?) परिस्थितीला आणि प्रश्नांना उत्तर वाटत नाहीत. एखादी नवीन गोष्ट समाजमान्य होण्यासाठी काही काळ द्यावा लागतो.
आता सहमत किंवा असहमत..
आई वडिलांचा 'सांभाळ करणे' (ह्याची व्याख्या वरील प्रतिक्रियेत मी दिली आहे) हे (अजूनही) आपल्या (भारताच्या) संस्कृतीचा भाग समजलं जातं (आता जातं तर जातं, त्याला मी काहीच करू शकत नाही. ही मानसिकता चांगली कि वाईट हे ठरवणं इतर महान लोकांवर सोडून देऊ.).
मुलगा धडधाकट असताना आई वडील वृद्धाश्रमात राहतात हे समाज पटकन मान्य करत नाही (वस्तुस्थिती आहे).
बागबान बघितला असेलच. तो एक पिक्चर असला तरीही समाजातील व्यवस्था त्यात मांडायचा चांगला प्रयत्न आहे. त्या डायरेक्टरनी तुमच्याकडून स्क्रिप्ट घेतली असती तर समाजप्रबोधन होण्यास बराच हातभार लागला असता !
वृद्धाश्रम (एक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी करेल ते सर्व काही करणारे वृद्धाश्रम) हा कदाचित बाहेर देशातील राहणीमानामध्ये चांगला पर्याय 'असू शकतो'. तो भारतात रुजण्यासाठी अजून काही अवधी जावा लागेल.
आई वडिलांच्या अंत्य विधीला मुलगा काही करणाभावी येऊ शकला नाही, हे तर "काहीच्याकाही" म्हणावे लागेल. तांत्रिक बाबी मांडताना (किंवा आपली स्वप्न सांभाळताना?) भावनांचा तुम्ही पार कडेलोटच केलात की ! आणि असा विचार करणारे तुमच्या सारखे अनेक असतील तर ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. (पण नसावेतच बहुतेक).
खालील मुद्द्याशी सहमत.
स्वतः वार्धक्याला झुकलेल्या मुलाला आपल्या आईवडिलांची सेवा करणं शक्य होत नाही हे वास्तव आहे. आणि पुढील काळात अशी परिस्थिती येणार आहे हेही समोर दिसत आहेच.
ह्या वेळेस (सर्व काही करणारे) वृद्धाश्रम किंवा तत्सम व्यवस्था हाच एक पर्याय राहतो. नातवाने आजी आजोबांची सेवा करावी ही अपेक्षा खूपच वाढीव ठरेल. (पण तसं करणारे सुद्धा माझ्या ओळखीत आहेत, पण मलाही हे जरा जास्तीच वाटतं).
फार काय बोलावं, अपेक्षा इतकी आहे की ह्यातून योग्य पर्याय सुचवणं. कान डोळे झाकून घेतल्यानं किंवा वेगळ्या विचारांची झापडं लावून घेतल्यानं परिस्थिती बदलत नाही.
वृद्धाश्रमाचा एक पर्याय तुम्ही सुचवला आहे. ज्याला तो पटेल तो हा पर्याय अवलंबेल. त्याचे परिणाम बघूनच समाज त्याला accept किंवा reject करेल.