अनेक दशकां पूर्वी एक कथा वाचली होती, लेखक आठवत नाही. त्यात काही "नाविन्यपूर्ण" पाक कृती व इतर काही बनवायच्या वस्तूंच्या रेसीपी दिल्या होत्या. त्यातील एक काहीशी अशी होती.
गुळाचा गणपती.
साहित्य - एक तीन-चार वर्षे वयाचा मुलगा
कृती - मुलाला सदैव आपल्या बरोबर माजघरात बसवून ठेवावे. इतर मुले खेळायला त्याला बोलावायला आली कि म्हणावे "नको रे बाळा. तू जाऊ नकोस. पडशील, बाऊ होईल. तू आपला घरीच खेळ". इतर मुले पावसात चिंब भिजत असली, झाडा वरच्या कैऱ्या पाडत असली, तर त्याला जाऊ देऊ नये. म्हणावे " नको रे बाळा. तू जाऊ नकोस. सर्दी होईल, ताप येईल. चल आपण दोघे घरीच खेळूया". शाळेची सहल झू बघायला जाणार असली, इतर मुले-मुली जात असली तरी याला जाऊ देऊ नये. म्हणावे " नको रे बाळा. तू जाऊ नकोस. तिथे तुला काही त्रास झाला तर ? तुला बाहेरचे खाल्लेले पचत नाही. पोट खराब होईल. तुला झू बघायचा आहे ना, बाबा तुला घेऊन जातील".
असे सातत्याने करीत राहावे. दहा-बारा वर्षात छान गुळाचा गणपती तयार होतो. खूप टिकाऊ असतो. एकदा झाला कि मग काय वाट्टेल ते केले तरी तसाच राहतो.