"ती सध्या काय करते या" सिनेमाच्या कथानकात खटकलेली किंवा न पटलेली गोष्ट अशी, कि लहानपणीची मैत्रीण असेल, व फक्त मैत्रीणच असेल, तर तिचे असणे, तिला भेटण्याची इच्छा असणे, व भेटणे, हे सर्व सध्याच्या पिढीत पत्नी पासून लपवून ठेवण्याचे कारण काय? दोन पिढ्यांपूर्वी पतीला मैत्रीण असणे कदाचित मान्य नसेल. पण आता काळ खूपच बदलला आहे. आजच्या तरूण मंडळींकरताच नव्हे, तर माझ्या पिढीत सुद्धा (मी, ६५+) मला मैत्रीणी आहेत हे मी माझ्या पत्नी पासून, (किंवा तिला मित्र आहेत हे तिने तिच्या पती पासून) काहीही लपविण्याची गोष्ट नव्हती. माझ्या लहानपणी माझ्या बरोबरीच्या, दोन वर्गातल्या, तीन नुसत्याच शेजारी, अश्या पाच मुलींशी माझी चांगली मैत्री होती. व ती प्रत्येकाच्या लग्ना नंतर पण मस्त चालू राहीली, अधिक परिपक्व झाली. अर्थात ही मैत्री माझ्या पत्नीला, व त्यांच्या पतीला पण मान्य असणे आवश्यक आहे. या पैकी एकाला पण ते आवडले नाही, तर मग ती रिलेशनशिप तिथेच संपवावी लागेल. माझ्या बाबतीत असे झाले कि संबंधित सर्वच लोकांना त्या मैत्रीतील स्वच्छता जाणविली, हे आमचे सर्वांचेच भाग्य. त्यातील एक तर माझ्या पत्नीची इतकी चांगली मैत्रीण झाली, कि नंतर कोणालाही असेच वाटावे कि मुळात ती माझ्या पत्नीचीच लहानपणीची मैत्रीण आहे, व माझ्याशी तिची ओळख माझ्या लग्ना नंतर झाली आहे.
दुसरी, आम्ही आपापल्या वाटेने गेल्या वर दुसऱ्या गांवी असल्याने 28 वर्षे केवळ फोन व नंतर इमेल वरच भेटत असे. पण तिच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन्ला आम्ही उभयतांनी आलेच पाहिजे असा तिचा आग्रह होता. त्या वेळी आम्ही दोघे शेजारच्याच दोन गांवात, ५ तास अंतरावर, होतो. तर मी व पत्नी गेलो. तोच दिवस आमच्या लग्नाचा पण वाढदिवस होता. व ही गोष्ट 28 वर्षां नंतर माझ्या मैत्रीणीच्या लक्षात होती !! Simply Amazing. हॉल मध्ये पोहोचलो तर काय - तिने आमच्या ऍनिवर्सरी करता खास केक बनवून घेतला होता. व अनाउन्स्मेट केली, कि हा माझा मित्र मला 28 वर्षां नंतर भेटत आहे, व आज त्याची पण ऍनिवर्सरी आहे. वगैरे.
तर, असे लोक मला भेटले हे माझे भाग्य. दुर्भाग्य असे, कि यातील दोन मैत्रीणी पन्नाशी उलटताच कॅन्सर ने गेल्या. एकीने पाच वर्षे निकराची झुंज दिली, दुसरीचा कॅनसर फारच ऍग्रेसिव प्रकारचा होता, व तिला लढण्याची पण संधी मिळाली नाही. असो.