नक्की काय सांगायचंय, हा प्रश्न अप्रस्तुत आहे.  कारण त्यांना नक्की काय सांगायचय, ते अगदी स्पष्ट आहे. झाल अस, कि वेळ जात नव्हता म्ह्णून ते मित्राच्या घरी पुस्तक वाचत बसले होते. तेव्हढ्यात वहिनींनी हाक मारली "चहा तयार आहे". पुस्तकात खुणेचा कागद ठेवून ते स्वयंपाकघरात टेबलावर जाऊन बसले.  चहा घेताना वहिनींची अस्वस्थता जाणवली म्हणून त्यांनी विचारलं "काय झालं वहिनी?? "
डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसत त्या म्हणाल्या, "सांगते पण मला माफ कराल ना". त्यांना काहीच उमजेना, ते म्हणाले "अगं तुझा नवरा मला मित्र असला तरी भावापेक्षा जास्त प्रिय आहे, निःसंकोचपणे सांग काय ते"
"भावजी आज तुमच्या मदतीमुळे आम्ही आर्थिक संकटातून बाहेर पडलोय पण त्याच्या आधी प्रत्येक वेळी मी पैशाचा रुबाब आणि मोठेपणा दाखवून अप्रत्यक्षपणे तुमचा आणि कुटुंबाचा अपमानच केलाय, मनात घर केलंय त्या चुकीनं"; असं म्हणून त्यांना जरा हुंदकाच लागला.
"अगं भरल्या घरात असं रडू नये, डोळे पूस आधी" असं म्हणून त्यांनी पटकन तिला एक रुमाल आणून दिला नवऱ्याचा.
"नाही मला बोलू द्या आज, २-२ श्रीमंत सख्खे भाऊ असून सुद्धा, ५-७ श्रीमंत मैत्रिणी असून सुद्धा कुणी कुणी फिरकले नाही. तुम्ही नुसते धावून नाही आलात तर इकडे मुक्काम करून सगळी घडी सावरलीत. माझा संसार आज तुमच्या मुळेच उभा राहिलाय, मला माफ कराल ना"
डोळ्यातले अश्रू दिसू न देता ते म्हणाले, "अगं लहानपणी देवाने माझी सख्खी बहीण नेली. जेव्हा तुझ्या नवऱ्याचे लग्न ठरले आणि आम्ही तुला पाहायला आलो तेव्हा तुला बघून अगदी तिचीच आठवण झाली बघ. तुझा हा भाऊ नेहमी तुझ्या सोबतच असेल. आज तुझ्या
डोळ्यात शेवटचं पाणी आलंय पुन्हा ती वेळ नाही येऊ देणार मी".
किचनच्या दरवाजात उभे राहून तिचे नवरोबा त्यांच हे भावाबहिणीचं संभाषण अगदी शांतपणे ऐकत उभे होते.

आता तरी समजल का? कि अजून पण नाही समजलं?