कुठलाही अभिनिवेष न बाळगता लिहीलेला हा लेख मुकेशच्या कारकीर्दीचा अतिशय व्यवस्थित आढावा घेतो. लेख आवडला. 

मुकेशने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते किंवा नाही, हे नक्की ठाऊक नाही.  पण त्याच्या  गाण्याच्या मर्यादा ह्यामुळे आल्या नसाव्यात (किशोरकुमारने तरी तसे कोठे घेतले होते? ) पण माझ्या अंदाजानुसार, संगीतकाराने दिलेली चाल पटकन आत्मसात करून गाता येणे त्याला थोडेसे अवघड जात असावे. प्यारेलाल (लक्ष्मी - प्यारे ह्या संगीतद्वयींतील संगीतकार) ह्यांनी ह्याचा उल्लेख एका मुलाखतीमध्ये केला आहे.  'मिलन' मधील 'सावन का महिमा' त्यांनी मुकेशला शिकवले. पण ते म्हणतांना तो बराच चुका करू लागला. प्रोड्युसर व त्याचा जथा, रेकॉर्डींग स्टुडियोतून कपाळावर हात मारत निघून गेला. शेवटी मुकेश संगीतकरांना म्हणाला, 'तुम्ही मला कितीही शिकवा, मी शेवटी मला येते तसेच गाणार! '. दुसरे, अवघड जागा त्याला सहज जमत नसाव्यात (असा एक अंदाज आहे). हे सगळे असूनही त्याने जी गीते गायिली ती कमालीची विलक्षण आहेत, व त्यांतील बहुतांश कधीही विसरता येणार नाहीत.  इथे हे नमूद केले पाहिजे की अनिल बिश्वास व सलील चौधरी ह्या अतिशय चोखंदळ संगीतकारांची, पुरूष- पार्श्वगायनासाठी मुकेश हीच प्रथम पसंती होती!

मी त्याच्याविषयी जे काही ऐकले, वाचले आहे, त्यावरून मला असेही वाटते, की तो अतिशय खुल्या दिलाचा असावा. स्वतःच्या गाण्यावर तो विनोद करायचा, 'माझ्याइतके बेसूर कोण गाईल' अशा अर्थाचे.  बहुधा ह्याचा सर्वसामान्य जनतेत चुकीचा अर्थ घेतला गेला. ह्यावरून आठवले, पूर्वी खासकरून हिंदी चित्रपट संगीताला वाहिलेला एक न्यूजग्रूप होता. त्यात, स्वतःला जाणकार समजणाऱ्या अनेकांच्या चर्चा व्हायच्या. अशाच एका चर्चेच्या दरम्यान कुणीतरी मुकेशच्या तथाकथित बेसूर गाण्याचा उल्लेख केला. ह्या ग्रूपवर तेव्हा मुकेशशी व्यक्तिगत परिचय असलेले, व संगीतातील खरेखुरे दर्दी एक गृहस्थ होते. त्यांनी जाहीर आव्हान दिले की कुणीही मुकेशने गायलेल्या गीतातील बेसूर भाग दर्शवावा. हे आव्हान कुणीही घेतल्याचे मी तरी तेव्हा पाहिले नाही. वास्तविक रेकॉर्डिंगमध्ये गातांना काहीही चुका झाल्या, तर सर्वसाधारणपणे त्याचा रीटेक केला जाईल. अगदी अनेकदा तसे करूनही  ती चूक सुधारता येण्यासारखी नसेल तर तो भाग बदलला जाईल. थोडक्यात अशी चूक जर कुणाची झालीच, तर ती श्रोत्यांपर्यंत येऊ नये. असो.