वास्तविकात आचरण बदलून सत्य गवसेल ही धारणाच चूक आहे. याउलट सत्य गवसल्यावर आचरण आपसूक बदलतं. आचरण सुधारण्यात जन्म जाईल आणि तरी इतका अंतर्विरोध शिल्लक राहील की शेवटाला आयुष्य व्यर्थ गेलं असं वाटायला लागेल. पुलं म्हणतात तसं, ' रुद्राक्षही नाही आणि द्राक्षंपण नाही! ' अशी परिस्थिती होईल. थोडक्यात, जगायचंही राहून जाईल आणि मुक्ती तर दूरच राहील.
सत्य ही आचरण बदलून प्राप्त होणारी गोष्ट नाही कारण ते सार्वभौम आणि अनाबाधित आहे. ते कारण रहित आणि निरालंब आहे. त्यामुळे व्यक्तीच्या आचरण बदलण्यानं ते प्राप्त होईल ही आशा फोल आहे. सत्य गवसण्यासाठी कुशाग्र बुद्धी आणि आपण मूळात सत्य आहोत ही समज आवश्यक आहे कारण सत्यापरता दुसरं काहीही नाही म्हटल्यावर आपण त्यापासून वेगळे असूच शकत नाही किंवा आचरण बदलून त्याच्याशी एकरुप होऊ शकत नाही कारण सत्यही क्रिया नसून स्थिती आहे.