लक्षपूर्वक लेखन वाचल्याबद्दल  धन्यवाद. 
तुम्ही दर्शविलेल्या  त्रुटीं बद्दल ... 
माझे लेखन हे पूर्णपणे श्री ग्रंथराज दासबोध या ग्रंथावर आधारित आहे.  त्यामूळे ते वाचताना  संदर्भाची ती चौकट ध्यानात घेणे जरूरी आहे.  तसे केल्यास  अनेक शंकांचे निरसन होण्यास मदत होईल. 
(१) कुणीही अस्तित्वात नाही अशी स्थिती  अजूनतरी नाहीये.  त्यावेळी जे होईल, असेल ते कुणीही ठामपणे वर्तवू शकत नाही. समर्थांनी सांगीतले आहे, की साधकाला जेव्हा ज्ञानप्राप्ती होते तेव्हा सारे भ्रम नाहीसे होतात. क्षुद्रत्व ही  अक्षमता या अर्थाने नाही तर  दिव्यत्वाची प्रचिती आल्यानंतरची विनम्र जाणीव आहे.  तुच्छपणाबद्दल पण तेच.  हे स्वतः बद्दल वाटलेला हीन पणा नसून , आपल्याहून जे  श्रेष्ठ आहे त्याला मान्यता देणे आहे. 
(२)  सृष्टीचा निर्माता कुणी नाही हे तुमचे मत आहे. जे सर्वमान्य आजही नाही. अजूनही सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य काय असेल याबाबत एकवाक्यता नाही. अनेकांच्या अनेक अमजूती. समर्थांनी जेव्हा ग्रंथलेखन केले  त्याकाळात तर अंतराळ, अवकाश निरीक्षणाच्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या.  त्या काळात जे ज्ञात होते, आणि शहाण्या जनांनी त्यांच्या बुद्धी आणि अनुभवांवर आधारीत जे निष्कर्ष काढले, तेच प्रचलीत होते.  त्यामुळे या संदर्भ प्रकाशात जर लेखन वाचले तर तुम्हाला या त्रुटी जाणवणार नाही.  
(३) युगांचे  वर्णन ही केवळ कविकल्पना आहे असे तुम्ही म्हणता ते त्याला जोडुन येणाऱ्या पुराणकथांमुळे का?  त्या कथा बाजूला ठेवल्यास लक्षात येईल की पृथ्वीचे वय काय आहे याचे मापन करण्यात आलेले आहे, आणि तो काळ देखिल आफाट आहे. ( समर्थांच्या काळात असे काही मापन झाले नसावे. परंतु  उपलब्ध ज्ञान आणि माहितीच्या आधारे त्यानी युग  संकल्पना मांडलेली असणार. ) त्याच्याशी एखाद्या मर्त्यमानवाच्या जीवनकाळाची तुलना  केल्यास, त्याचे क्षणभंगुरत्व तुमच्या  लक्षात येईल. 
(४)  "परमेश्वर असा कुणीच नाही   ... "  हे तुमचे मत.  समर्थांनी तेच म्हणले आहे.  देवाचे सगुण साकार रूप ही मानवाची निर्मिती आहे.  जे मुळब्रम्ह आहे त्याला स्थळकाळाची बंधने नाहीत. ते अनादी  अनंत आहे यात काहीच दुमत नाही. 
(५) ह्या मुद्द्यात तुम्ही दोन परस्पर विरोधी विधाने केली आहे.  १. परमेश्वराचे सत्यस्वरूप असे काही नाही. २. स्वरूप एकच आहे. आणि आपल्या सर्वांचे सारखे आहे. 
हेच जे स्वरूप आहे ते जाणून घ्या असे समर्थांचे सांगणे आहे. त्यानीच म्हणले आहे की ते सर्वत्र चराचरामध्ये भरून राहीलेले आहे. 
प्रत्येकाची उपासनेची व्याख्या वेगळी असू शकते.  कुणाला कोणत्या मार्गाने  ज्ञानप्राप्ती होईल हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा  आणि समजुतीचा प्रश्न आहे. 

परत एकदा विनंती की हे लेखन दासबोधाच्या संदर्भ चौकटीत वाचावे.  त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा शंकांचे  निराकारण होईल.  
शक्य असल्यास दासबोधाचे वाचन करावे, आणि त्यात  तुम्हाला गवसलेला अर्थ इथे  जरूर लिहावा. 

सविस्तर प्रतिक्रियेसाठी अनेक आभार !