सारं अस्तित्व हे आकार आणि निराकार मिळून बनलेलं आहे. दोन्ही एकमेकांची खुमारी वाढवतात. कल्पना करा, नुसतं रिकामं स्टेज कितीही अविनाशी, अचल, अपरिवर्तनीय वाटलं तरी त्यावर पात्रांचा वावर झाल्याशिवाय ते निरर्थक आहे. ही पात्रं भले कालबद्ध असतील, पण त्याच्याशिवाय रिकाम्या स्टेजचा उपयोगच नाही.

अर्थात, स्टेजशिवाय नाटक शक्यच नाही पण म्हणून नाटकाला 'माया' 'नाशवंत' 'चंचल' अश्या उपाधी लावून त्याची चव घालवणं म्हणजे जीवन निरस करणं आहे.

थोडक्यात, एकतर या संतांना जीवनाची मजा घेता आली नाही किंवा मग त्यांना सत्य समग्रतेनं कळलं नाही. मृत्यू आहे म्हणून तर जगण्यात मजा आहे. फूल कोमेजणार आहे म्हणून तर त्याच्या क्षणभंगुरतेची खुमारी आहे. गाणं संपणार आहे म्हणून तर ते ऐकण्यात मजा आहे.

मंगेश पाडगावकरांचा उदासबोध फार मनोरंजक आहे.