बरेच काही कळले नाही

1 - "नॉन इनवेझिव" तपासण्या, जसे ट्रेड मिल टेस्ट, यातून फक्त येवढेच कळते कि हृदयाच्या धमनीत अडथळा/ळे आहे/त. पण अडथळे नेमके कोणत्या धमनीत/धमन्यात आहेत, किती आहेत, धमनीत नेमके कुठे आहेत (धमनीच्या तोंडाशीच, मध्यात), व किती टक्के ब्लॉक आहेत, हे कळत नाही. व हा तपशील कळल्या शिवाय ऍंजियोप्लास्टी करायची, का बायपास, (किंवा, काहीच नाही), हा निर्णय घेता येत नाही. हा तपशील फक्त ऍंजियोग्राफीतूनच समजतो. म्हणून धमनीत गंभीर अडथळे असण्याची शंका असल्यास आधी ऍंजियोग्राफी करतात. जर ऍंजियोप्लास्टिने काम होणार असेल, तर ते त्याच वेळी करून टाकतात. (जसे, तुमचे केले). अन्यथा, बायपास करता सर्जन कडे जाण्याचा सल्ला देतात. तर, सदर रुग्णाची  ऍंजोयोग्राफी झाली होती का? जर झाली नसेल, तर बायपासचा सल्ला, ते सुद्धा आठ दिवसाच्या आत करा इतक्या ठामपणाने, हे कळले नाही. 

2- क्षणभर असे समजूया कि तातडीने बायपास करण्यचा सल्ला देणाऱ्या डॉक्टर्ला फक्त सर्जन कडून मिळणाऱ्या टक्केवारीत स्वारस्य होते.  तरी पण ऍंजोयोग्राफी  झालेली नसताना, "बायपासची गरजच नाही",  हा दुसऱ्या टोकाचा ठाम सल्ला कसा काय दिला, हे पण कळले नाही.

3- आणि जर ऍंजोयोग्राफी झाली असेल, तर मात्र पुढे काय करायचे या बाबत फार संदिग्धता उरत नाही. कारण ब्लॉकेज उघड दिसतातच. काही केसेस मध्ये थेट बायपासच, का आधी एक ऍंजोयोप्लस्टीचा प्रयत्न, या बाबत दुमत असू शकते. पण अँजियोग्राफी नंतर येवढी संदिग्धता - एका टोकाला आठ दिवसाच्या आत बायपास करा, ते दुसऱ्या टोकाला फक्त औषधे घ्या, हे कसे ? हे कळले नाही. 

4- आठ दिवस औषध दिले आणि तो रुग्ण पूर्ण बरा झाला. हृदय रोग "बरा" होत नसतो, आठ दिवसात तर अजिबात नाही. औषध दिले, शस्त्रक्रिया टळली, व आता तो रुग्ण औषधांनी स्वतःला व्यवस्थीत मेंटेन करत आहे", असे लिहिले असते, तर ते एक वेळ समजू शकले असते. पण आठ दिवस औषधांनी हृदय रोग पूर्ण बरा झाला, हे कळले नाही.

5-  एका डॉक्टरने काही मोठी शस्त्रक्रिया सांगितल्यास  रुग्णाने "सेकंड ओपीनीयन" घेणे सहाजिकच आहे. पण अश्या "सेकंड ओपीनीयन" करता रुग्ण त्याच शाखेतील दुसऱ्या तज्ञा कडे जात असतो.  माझे बंधू एम.. डी. मेडिसीन व डी.एम. नेफ्रॉलॉजी आहेत,  असे तुम्हीच मागच्या एका लेखात सांगितले होते.  जो रुग्ण जो पूर्वी तुमच्या बंधूं कडे कधीच आला नव्हता, म्हणजे तो तुमच्या बंधूंचा मित्र / नातेवाईक/ अनेक वर्षां पासूनच पेशंट, नव्हता.  मग बायपास बाबत "सेकंड ओपीनीयन" घेण्या करता तो रुग्ण नेफ्रॉलॉजिस्ट कडे का गेला ? हे कळले नाही.

6-  जर बायपास विनाच तो रुग्ण आठ दिवसात बरा झाला, तर कदचित त्याला हृदय रोग नव्हताच. तरी, हा निर्णय नेफ्रॉलॉजिस्टने कसा काय घेतला? त्याला कॉर्डीयोलॉजिस्ट कडे का पाठविले नाही?  एका शाखेतील तज्ञ डॉक्टर सहसा दुसऱ्या शाखेतील विकारावर सल्ला देत नाही. रुग्ण हा जवळचा मित्र / नातेवाई असेल तर, आपुलकीने म्हणून, कदाचित काही सल्ला देईल. पण तरी देखील सहसा तो हे सांगेलच, कि "हे बघ, हा माझा प्रांत नाही.  तुला विश्वासाचा सेकंड ओपीनीयन हवा असल्यास मी  त्या शाखेतील तज्ञ माझ्या मित्रा कडे पाठवितो". मूत्र विकारा करता नेफ्रॉलॉजिस्ट कडे आलेल्या रुग्णाने जर छातीत दुखत असल्याची तक्रार केली, तरी नेफ्रॉलॉजिस्ट त्याला सांगेल कि मी तुमच्या मूत्रपिंड समस्ये करता औषध देतो. छातीत दुखते त्या करता तुम्ही कार्डियोलॉजिस्टला दाखवा. तर प्रस्तुत प्रकरणात एका नेफ्रॉलॉजिस्टने तातडीने बायपास करायची का नाही या गंभीर मुद्द्या वर सल्ला देण्याची जबाबदारी स्वतःवर का घेतली ? हे पण कळले नाही.

शेवटी - या सर्व लिखाणाचा हेतू तुमच्या डॉक्टर बंधूंच्या कौशल्या बाबत शंका घेणे, हा नाही. तसेच तुम्ही जे काही लिहिले, त्याच्या सत्यते बाबत शंका घेणे, हा पण नाही.  पण मागच्याच आठवड्यात मी एक लेख लिहिला होता, ज्याचा मतितार्थ असा होता कि इंटर्नेट / फेसबुक इत्यादी ठिकाणी आपण जे काही वाचतो, ते स्वीकारायच्या आधी स्वतःलाच काही प्रश्न विचारावेत. त्याचे एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हे प्रश्न उपस्थित केले. त्याची उत्तरे/ स्पष्टीकरण तुम्ही द्यावेच असा कुठलाही आग्रह नाही. व वाद घालण्याचा उद्देश पण नाही.