आपल्या समाजात कोणत्याही नव्या संशोधनाची टवाळी करण्याचा प्रघात आहे. हे योग्य नाही. गुरुजींच्या शेतातील आंबे खाल्ले, ( आपण त्यांना "खास आंबे" म्हणू ) तरी अपत्य प्राप्ती होत नाही, असे कोठेही सिद्ध झालेले नाही. असो. काही गोष्टी कळल्या नाहीत, म्हणून विचारीत आहे. माहीत असल्यास नीट उत्तरे द्यावीत, अन्यथा उगाच टिंगल / टवाळी करू नये.
१- "खास आंबे" खाल्याने अपत्य प्राप्ती फक्त स्त्रियांनाच होते, का पुरुष पण गरोदर राहण्याची शक्यता आहे?
२- कितीही "खास आंबे" खाल्ले तरी अपत्य एकच, का एक आंबा खाल्यास एक अपत्य, दोन आंबे खाल्यास जुळे, तीन खाल्यास तिळे, असे काही समीकरण आहे?
३- "खास आंबे" खाल्ल्याने होणारे अपत्य हे "इतर मानवी प्रयत्नांनी" झालेल्या अपत्या सारखेच असते, का त्यात काही विशेष गुण असतात?
४- अपत्येच्छुकांनी "खास आंबे" खाल्ल्या वर "इतर मानवी प्रयत्न" थांबवावेत/ चालू ठेवावेत/ चालू ठेवण्यास हरकत नाही . . .?
५-अपत्य प्राप्ती आंबा हा आंबा याच स्वरूपात (जसे आंब्याच्या फोडी) खाल्यानेच होते, का त्या आंब्या पासून केलेल आमरस, आम्रखंड, आमपापड, फ्रूटी,इत्यादी सेवन केल्याने पण होऊ शकते ?
६- आम्रखंड, फ्रूटी, इत्यादी करणाऱ्या उद्योगां पैकी कोणी गुरुजींच्या शेतातील आंबे वापरतात का?
७- अपत्य प्राप्तीची इच्छा नसताना पण, "खास आंबे" वापरलेले आम्रखंड खाल्याने (म्हणजेच धोक्याने) अपत्य प्राप्ती झाली, तर त्या अपत्याच्या शिक्षणाचा खर्च चितळे बंधू यांच्या कडून मागता येईल का? ग्राहक न्यायालयात या संदर्भात तक्रार करत येईल का?
या सर्व गोष्टींची शहानिशा होई पर्यंत सरकारने नियम करून आम्रखंड, आमपापड, फ्रूटी, इत्यादी उत्पादनांवर त्यात कोणच्या शेतातील आंबा वापरला आहे, हे छापण्याची सक्ती करावी.