वाचता आलं म्हणजे समजलं असं होत नाही.
अगदी बरोबर. वाचता आलं, म्हणजे समजलं, असं नाही. त्याच प्रमाणे, लिहिता आलं, म्हणजे (जे लिहिलं ते) समजलं, असं पण नाही. त्या पुढे, एकाद्या ने म्हंटले, कि मला अमुक गोष्ट समजली, याचा अर्थ त्याला ती खरोखर समजली, अस पण नाही. विषय पुस्तकी ज्ञानाचा असला, तर आपण त्या व्यक्तीला एक प्रश्न-पत्रिका देऊन बघू शकतो कि त्याला खरोखर किती समजले, कारण त्या प्रश्नांचे (तात्कालीन) बरोबर उत्तर काय, हे माहीत असते, त्या बाबत एकमत असते. पण समजा एका व्यक्तीने सांगितले कि त्याला "विश्वाचे रहस्य उलगडले", किंवा "जीवनाचे अंतिम सत्य समजले", तर त्याला जे काही समजले ते बरोबर का चूक, याची खातरजमा करता येत नाही. कारण विश्वाचे रहस्य / जीवनाचे अंतिम सत्य, खरोखर काय आहे, हे कोणाला माहीत आहे? त्या मुळे, कोणीही सांगावे कि मला विश्वाचे / मानवी जीवनाचे रहस्य उलगडले. सांगणाऱ्याचा वेष पायघोळ कफनी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध, भरघोस दाढी-मिश्या, वगैरे असला, तर बरेच लोक विश्वास ठेवतात.
पं जसराज यांची दरबारी कानडा रागात एक सुंदर बंदिश आहे. अजब तेरी दुनिया मालिक. को जाने, को न जाने. जो जाने वा को न जाने. (देवा, तुझी दुनिया अजब आहे. ती काहींना समजली आहे, आणि काहींना समजली नाही. पण ती ज्याला समजली आहे तो कोण, हेच कोणालाही समजलेले नाही.) तर, पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडची कोणतीही गोष्ट "समजणे" हा एक फक्त एक समज असतो, व त्या पलीकडे काहीही नाही.
"आपण" कोण ? स्वतःला देह समजणं आणि . . . स्वतःला मनोनिर्मित व्यक्ती समजणं. अर्थात, हे दोन्ही गैरसमज. . .
तर, तुमच्या मते आपण "देह" नाही, व आपण "मनोनिर्मित व्यक्ती" पण नाही. मग "आपण" कोण? त्याचे उत्तर तुम्ही दिलेले नाही. म्हणून, ते सिद्ध करा असे आव्हान पण देता येत नाही. फार तर असा प्रश्न विचारता येईल, कि "आत्महत्या : कारणमीमांसा आणि सोडवणूक" हा लेख "कोणी" लिहिला आहे? संजय क्षीरसागर यांनी ? पण संजय क्षीरसागर म्हणजे "कोण" ? "देह" पण नाही, व "मनोनिर्मित व्यक्ती" पण नाही. मग "कोण" ? अध्यात्म या प्रांतात एक छान सोय असते. कोणतेही रस्ते नसतात आणि कोणतीही गंतव्य स्थाने नसतात. त्या मुळे कोणीही कोणत्याही दिशेने प्रवास करावा, कुठेही पोहोचावे, व मी गेलो तीच योग्य दिशा, व मी जिथे पोहोचलो तेच योग्य डेस्टिनेशन, असे सांगावे. म्हणून या भारत भूमीत "वासनेवर विजय मिळवा" असे सांगणारे, व "भोगातून समाधी कडे" असे सांगणारे, (पुण्यात कोरेगांव पार्क येथे त्यांचा भव्य दिव्य आश्रम आहे). दोन्ही संतच असतात. "जो जे जसे वांच्छील, तो ते तसे लाहो"
आत्महत्येची फक्त दोनच कारणं आहेत. एक म्हणजे शारीरिक यातना असह्य होणं . . किंवा मग स्वप्रतिमेचा बोजवारा उडायची प्रचंड दहशत वाटणं.
विन्सेंट वोन गॉग, अर्नेस्ट हेमिंग्वे, मर्लीन मोनरो, गुरू दत्त, मनमोहन देसाई, दिव्या भारती, . . . भय्यू महराज, यांना कोणत्याही दुर्धर व्याधीने ग्रासलेले नव्हते; ते कर्जबाजारी नव्हते; व त्यांच्या स्वप्रतिमेचा बोजवारा उडावा असे काहीही घडलेले नव्हते. सर्वच लोकप्रीयतेच्या शिखरा वर होते. या सर्वांना घोर नैराश्याने ग्रासलेले होते. असे वाटते कि घोर नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीशी तुमचा जवळचा संबंध आलेला नाही, म्हणून ही काय भयानक अवस्था असते, याची तुम्हाला कल्पना नाही. किंबहुना, "घोर नैराश्य" म्हणून काही असते, हेच तुमच्या खिजगणतीत नाही.