तुम्ही नीट वाचत नाही का तुम्हाला मुद्दाच कळत नाही ?
मला मुद्दाच कळत नाही. मान्य. सहसा मी अध्यात्मवाद्यां बरोबर वाद घालण्याच्या फंदात पडत नाही. कारण ते जे काही विचार मांडतात, ते "ऍक्झियॉम" या श्रेणीत असतात. म्हणजे "स्वयं सिद्ध सत्य", ज्याला आधार/ निरिक्षण/ पुरावा/ याची गरजच नसते. जसे, आपण देह असणे, व आपण मनोनिर्मित व्यक्ती असणे, हे दोन्ही "गैर समज" आहेत, असे तुम्ही सांगितले. काय आधारे ? (खरं तर, असे काही "समज" आहेत, हेच मला माहीत नव्हते. मी आपल, स्वतःला फक्त "चेतन पंडित" समजत होतो, व आहे) समजा केवळ वाद घालण्या करता म्हणून मी प्रतिपदन केले, "होय आपण देहच आहोत", तर तुम्ही "आपण देह नाही" हे सिद्ध करू शकता? करून दाखवा. हे आव्हान नाही. मला कुतुहल आहे, कसे सिद्ध करतात कि आपण देह नाही?
शेवटच्या क्षणी तरी आपण देह नव्हतो हा उलगडा होणे. हा विचार जर कोणी विज्ञाननिष्ठ चर्चेत मांडला तर त्याला हे सांगावे लागेल, कि त्याला हे कसे कळले कि शेवटच्या क्षणी नेमका काय उलगडा होतो ते? तो स्वतः तर अजून "शेवटचा क्षण" या अवस्थेतून गेलेला नाही. त्याने "शेवटचा क्षण" या स्थितीत असलेल्या अनेकांच्या उशाशी उपस्थित राहून, "शेवटच्या क्षणी" त्यांना काय काय उलगडे झाले याचा सर्व्हे केला आहे का? व त्यातील अनेकांनी त्याला असे सांगितले का, "अहो, मरणाच्या उंबरठ्यावर मला आत्तच उलगडा झाला कि मी देह नाहीच, नव्हतोच " ? केला असल्यास त्याचा डेटा द्यावा - किती लोकांचा "शेवटच्या क्षणी" सर्वे केला, कोणाला काय काय उलगडे झाले, इत्यादी. शेवटच्या क्षणी तरी आपण देह नव्हतो हा उलगडा होणे हा विचार/ निष्कर्ष / सिधान्त कुठून आला?
पण अध्यात्मनिष्ठ चर्चेत अशी "स्वयं-सिद्ध" विधाने बिनदिक्कत "फेकली" जातात. किंबहुना, विधानाला आधार नसणे / असणे हाच अध्यात्म आणि विज्ञान, यातला फरक आहे. म्हणून मी सहसा अध्यात्मवाद्यां बरोबर वाद घालण्याच्या फंदात पडत नाही. या वेळी मोह आवरता आला नाही (विश्वामित्रांना पण जमले नाही, मला कुठले जमायला) म्हणून थोडा वाद घातला. असो. विदेहत्व ही कायम स्थिती आहे; स्वतःला देह / मनोनिर्मित व्यक्ती समजणं हे दोन्ही गैरसमज आहेत; आपण देह नव्हतो हा उलगडा होणे; तो सुद्धा शेवटच्या क्षणी; आणि हीच ती पराकोटीची आध्यात्मिक साधना; हे सगळे माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे, हे मान्य करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.