आपल्या समाजात नेता/ सरकारी अधिकारी यांची कायम टिंगलच करायची असा संकेत आहे का? वास्तविक, कार्यालयात टी-शर्ट आणि जीन्स घालू नये असे सांगणे, यात काय चुकले? कुठे कोणता पोषाख करावा याबाबत काही संकेत सर्वच समाजात असतात. पाश्च्त्यांनी याला फॉर्मल, कॅज्युअल, पार्टी वियर, सेरेमोनियल अशी नांवे दिली. दुकानात शर्ट घ्यायला गेलात तर दुकानदार विचारतोच - फॉर्मल का कॅज्युअल ? आपण अशी नांवे नाही दिली, तरी पोषाखा बाबत संकेत आपल्या कडे पण आहेतच. सवाई गंधर्व महोत्सवात गायक किंवा संगत करणारे कलाकार टी-शर्ट व जीन्स घालून येत नाहीत; ओंकारेश्वर घाटा वर विधी सांगाणरे असोत अथवा लग्न लवून देणारे असोत, भटजी थ्री-पीस सूट घालून पुजा सांगत नाहीत; नोकरीच्या इंटरव्यूला कोणी धोतर-बंडी घालून जात नाहीत; व तुमचे कॉर्डियोलोजिस्ट त्यांच्या क्लिनिक मध्ये हाफ-पॅंट किंवा बर्म्यूडा घालून बसत नाहीत.
असा प्रश्न विचारता येईल कि वरील प्रमणे पोषाख करायला काय हरकत आहे? भटजी धोतर नेसून वरती उघडेबंब असतील तरच मृत्याच्या आत्म्याला शांती मिळेल; किंवा कॉर्डियोलोजिस्टने बर्म्यूडा घातली असेल तर तुमची औषधे चुकतील, असे तर काही नसते. तरी पण तसे करायचे नसते. टी-शर्ट आणि जीन्स हे कॅज्युअल वियर आहे. मला प्रवासात ढीला टी-शर्ट किंवा अर्ध्या-बाह्यांचा कुडता (मोदी-कुडता) घालायला आवडते. अनेकदा मला विमानतळा वरून थेट कार्यालयात जायचे असते. खर तर मी वरिष्ठतेच्या अश्या टप्प्या वर पोहोचलो आहे, कि मी टी-शर्ट किंवा मोदी-कुडता घालून मीटींगला गेलो तरी मला कोणी काही बोलू धजणार नाही. तरी पण, मी विमानातून उतरल्या बरोबर वॉशरूम मध्ये जाऊन शर्ट बदलतो, व मगच बाहेर पडतो. समाजात कुठे कसे वागावे (व यात पोषाख पण आला) याचे काही संकेत असतात.