'मराठीत लिहिताना ....काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते' असेच लिहायला पाहिजे हे म्हणणे जरासे विवादास्पद आहे. पंडित नेहरू हे काँग्रेसचे नेता होते, नेते नव्हे. नेता, पिता, पत्नी, काका, मामा (काके-मामे हे रूप होते, पण ते नातेवाईक नसतात! ) ह्यांचे सहसा अनेकवचन होत नसावे.
नगरपालिकेच्या सदस्याला इंग्रजीत city father (plural - city fathers) म्हणतात. जेव्हा मराठीत त्याचे भाषांतर करायची वेळ आली, तेव्हा ते नगरपिता (अनेकवचन नगरपिते) असे करायचे ठरले. आचार्य अत्र्यांनी विरोध केला, "आम्हाला एवढे बाप नकोत, घरी एक आहे तेवढा पुरे! " तेव्हाच नगरसेवक या शब्दाचा जन्म झाला.
इत्यर्थ, काँग्रेसचे प्रवक्ता असे लिहिणे चुकीचे नसावे
ता. क. :- काही शब्दांची अनेकवचने होत नाहीत, तशी काही शब्दांची स्त्रीलिंगे होत नाहीत. राष्ट्रपतीचे स्त्रीलिंग राष्ट्रपत्नी होत नाही, ग्रंथपालाचे ग्रंथपाली किंवा ग्रंथपालिका होत नाही. ..... शुद्धमती राठी