भिडे गुरूजींनी दावा केलेला पुत्रदा (कामदा) आंबा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे सापडला आहे. संघाचे प्रचारक म्हणून भिडे गुरूजी वाशी येथे वास्तव्यास होते. तेव्हा मायभाटे गुरुजी यांच्या शेतातील आंब्याची त्यांना माहिती झाली. तेव्हापासून ते आंब्याचे प्रचारक झाले असल्याचे मायभाटे यांचा मुलगा प्रदीप यांनी सांगितले. राज्यभरातून अनेकजण हा आंबा घेऊन जाण्यासाठी येतात आणि तो खाल्ल्यामुळे संतती प्राप्त होत असल्याचा दावाही भिडे गुरुजींप्रमाणेच प्रदीप यांनीही केला आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाशी हे तालुक्याचे ठिकाण आहे. दिवंगत प्रल्हाद मायभाटे गुरुजींनी त्यांच्या सात एकर क्षेत्रावर शंभर ते सव्वाशे जातीच्या गावरान आंब्यांची लागवड केली आहे. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन कृषीमुनी पुरस्कार देवून सन्मानित देखील करण्यात आले. त्यांच्या या आंमराईत शंभर वर्षे जुने आंब्याचे झाड आहे. त्यांच्या चुलत्यांनी त्याची लागवड केली असल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली. बोली भाषेत भिरड्या असे नाव असलेल्या या आंब्याचे प्रल्हाद मायभाटे यांनी पुत्रदा (कामदा) असे नामकरण केले. तेव्हापासून या आंब्याचा गवगवा राज्याच्या कानाकोपर्यात पोहचला आहे. मायभाटे गुरुजींना एकूण चार मुले आणि एक मुलगा आहे. त्यांच्या दुसर्या पिढीतही मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत अधिक आहे. जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले त्यांचे चौथे सुपूत्र प्रताप यांनी वडील हा आंबा खाण्यासाठी नेहमी आग्रह धरीत असल्याचे सांगितले.
या वादग्रस्त आंब्याविषयी सर्वप्रथम १९९८ साली प्रकाशित झालेल्या वी. ग. रारूळ यांच्या ‘आंबावाण’ या पुस्तकात आंबा खाल्ल्यानंतर संतती होत असल्याचा दावा करण्यात आला. कृषी खात्यात १९५१ ते १९७२ या कलाावधीत जबाबदार अधिकारी असलेल्या तसेच १९८५ साली सुवर्णपदक व कृषिभूषण पुरस्कार पटकाविलेल्या राऊळ यांनी आंब्याच्या विविध वाणांची माहिती या पुस्तकात दिली आहे. म्हैसूर येथील अन्नतंत्र संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चिकित्सेनंतर कामेच्छा निर्माण करणारे हार्मोन्स यात असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
या
वादग्रस्त वक्तव्याच्या चौकशीचा भाग म्हणून नाशिक महापालिका वाशी येथे येऊन मायभाटे यांना नोटीस बजावणार आहे.