तुमच्यासारखे ते बिनधास्तपणे "मी रिलासन्सची शिफारस केली" म्हणत नाहीत.
हीच तर शोकांतिका आहे, की ते तसे म्हणू शकत नाहीत. ज्या समाजात खूप मोठ्या संख्येने मतदार अशिक्षित, अर्ध-शिक्षित, काही सुशिक्षित असले तरी तर्कशुद्ध विचार न करणारे, दुटप्पी, दांभिक, वगैरे असतात, त्या समाजात राजकारणी "होय, केली मी अमूक कंपनीची शिफारिस. आपल्या देशाच्या उद्योग-धंद्याच्या वाढीचा प्रयत्न करणे यात काहीही चूक तर नाहीच, उलट ते सरकारचे कर्तव्यच आहे." असे सांगू शकत नाहीत.
"धट्टी-कट्टी गरीबी, लुळी-पांगळी श्रीमंती" असले कमालीचे निर्बुद्ध विचार जोपासणाऱ्या आपल्या समाजाने उद्योगपतींना हिणविण्यातच धन्यता मानली, व अजूनही मानतो. कष्टाने उद्योग उभा करून शेकडोंना उपजीविकेची संधी देणारा, देशाच्या कर-उत्पन्नात भर टाकणारा उद्योगपती हा सिनेमात – खासकरून "नेहरूवियन ईकॉनॉमिक्स"च्या काळात - हा नेहमीच शोषणकर्ता खलनायक असे. व त्याचा दोन दमड्या पण कमावण्याची अक्कल नसलेला कर्तुत्वहीन पोरगा, जो कोणताही विचार न करता बापाने कामावलेल्या पैशयातून "मुनीमजी, इनको दस हजार रुपये दे दो" असे आदेश देऊन कामगारांना पैसे वाटून टाकत असतो, तो आदर्श, नायक असे.
बरे, खरोखर आपल्याला गरीबी धट्टी-कट्टी व श्रीमंती लुळी-पांगळी वाटते का? तर ते ही नाही. शुद्ध दांभिकपणा आहे. आता कोणीही पैसे पेटीत ठेवून ते बागेत पुरून ठेवीत नाही. ज्या रिलायन्सला आज हा समाज दूषण देत असतो, त्याच्या दहा रुपयाच्या शेयरची कींमत आज 1000 च्या वर आहे. ज्याला शक्य आहे तो थेट विकत घेतो; ज्याची तेवढी ऐपत नाही तो म्युच्युयल फंडातून गुंतवणूक करतो. ज्याला ते पण शक्य नाही, तो किमान बेंकेच्या एफडीत गुंतवतोच. बागेत कोणीच पुरून ठेवीत नाही. सेन्सेक्स खाली गेला, पीपीएफ चे एफडीचे व्याज कमी झाले की हाच वर्ग कासावीस होतो. पण वर मिजास काय, तर रिलायन्स/ अदाणी सर्व चोर आहेत. अश्या समाजात राजकारणी "होय, केली मी अमूक कंपनीची शिफारिस." असे सांगू शकत नाहीत.
या समाजात राज्यकर्त्याला केवळ चांगला पोषाख केला, नीटनेटके राहिले, म्हणून "सूटबूट की सरकार", असे हिणवले जाऊ शकते. त्याने काम काय केले, किंवा केले नाही, ते महत्वाचे नाही. गुन्हा काय, तर नीटनेटका राहतो. राज्यकर्त्यांने खादीच वापरली पाहिजे, ते सुद्धा ढगळ, अजागळ कपडे. अर्धे उघडे-बोडके राहिले तर अती उत्तम. विनोबा भावे आपले आदर्श. रितू बेरी, रीना ढाका, रोहित बाळ, जे जे वल्या, अश्या अनेक "फॅशन डिजायनर" तरुण तरुणांनी मेहेनत करून "चांगले कपडे", ही संकल्पना राबविली, परदेशात आपला ब्रांड जमविला, स्वतः श्रीमंत झाले, लाखोंना रोजगार दिला, देशाला कर-उत्पन्न मिळवून दिले. त्या आधी आपण सुधा पैठणी, शालू, बनारसी, वगैरे करता जीव टाकत होतोच की. पण आदर्श कोण? तर विनोबा भावे. अश्या समाजात तुम्ही आणखीन काय अपेक्षा करता?
राफेलच्या संदर्भात मोदींवर हल्ला करण्या करता अनेक कुतर्क पसरविण्यात येत आहेत, व सुशिक्षित लोक पण विचार न करता त्या कुतर्काना वजन देत आहेत. केवळ एकच उदाहरण देतो. रिलायांस या कंपनीला विमाने बनविण्याचा कोणताही अनुभव नाही, हा एक तर्क वारंवार पुढे करण्यात येतो.
आता जरा विचार करा. "कंपनीला" असा कोणताच अनुभव नसतो. "अनुभव" म्हणून जे काही असते, ते त्या कंपनीत काम करण्याऱ्या लोकांचे असते. व असे लोक हुडकून, नोकरीस ठेवून, कोणीही काहीही कामगिरी करू शकतो. जसे – 1991 पर्यंत भारतात मनगटी घड्याळे फक्त एचएमटी ही सरकारी कंपनी बनवीत होती. व त्यांची क्वालिटी काय होती हे मी सांगण्याची गरज नाही. 1991 मध्ये टाटांनी जेव्हां टायटन ही कंपनी स्थापन केली तेव्हां टाटांना मनगटी घड्याळे बनविण्याचा काय अनुभव होता? पण आज हीच कंपनी स्विस घडाळ्यांशी यशस्वी स्पर्धा करतात, इतकी उत्तम घड्याळे बनवीत आहे. व अनेक दशके मनगटी घड्याळे बनविण्याचा अनुभव असलेल्या एचएमटीला 2017 साली घड्याळे बनविणे बंद करावे लागले. एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्सिस, कोटक-महीन्द्र, यांना बेंकिंगचा काय अनुभव होता? पण याच आज सर्वोत्तम बेंका मानल्या जातात, व तथाकथित अनुभव असलेल्या सरकारी बेंकाचे दिवाळे वाजीत आहे व त्यांना एसबीआय मध्ये विलीन करावे लागत आहे.
धिरूभाई अंबानी/ लक्ष्मी मित्तल/ बाबा रामदेव यांना काय टेक्स्टाईल मिल/ पोलाद कारखाने/ आटा-नूडल्स अनुभव होता? पण यांनी सक्षम उद्योग उभे केले. अनुभव असलेले लोक असतील तेथून हुडकून आणून, त्यांना पदरी ठेवून काहीही करता येते. आणि विमाने बनविण्याचा सत्तर वर्षे अनुभव असलेल्या हिंदुस्तान एरोनोटिक्स ने काय दिवे लावले? तरी सुद्धा, या समाजातील सुशिक्षित "रिलायांस या कंपनीला विमाने बनविण्याचा कोणताही अनुभव नाही" या अजब तर्कावर विश्वास ठेवतील. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.