सुप्रिया सुळे या उत्कृष्ट खासदार नाहीत, उत्तम सेल्फीपटू आहेत.  कात्रज घाटात काम सुरु होण्यापूर्वी तुम्ही सेल्फी काढलात, त्यानंतर दुसरा सेल्फी काढलात तो फुरसुंगीला. खासदार म्हणून या प्रश्नी गडकरींकडे पाठपुरावा करण्याऐवजी सेल्फी काढण्यातच मग्न राहिलात. आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि गडकरींकडे पाठपुरावा करून हा रस्ता पूर्ण केला.

उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटू आपण नक्की होऊ शकाल. सेल्फी, आरोग्य शिबिरे किंवा जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. कोपऱ्यावरच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष अशी कामे नित्यनेमाने करत असतात. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही आपण हे काम करू शकता. त्यासाठी उगाचच खासदारकीची जागा अडवून ठेवणे योग्य नाही. केंद्राकडून इतक्या वर्षात एकही प्रकल्प आपण आणू शकला नाहीत. केंद्रीय रस्ते विकास निधीतून एक छदामही तुमच्या मतदारसंघात तुम्हाला आणता आला नाही यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते ? विमानतळ हा तसा केंद्राचा विषय पण त्याबाबत अजून तुमच्या घरातच एकवाक्यता नाही. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ या नावाने आपण एखादी मोहीम राबवा आणि आपली कामे जनतेला एकदा दाखवाच.

तुम्हाला पुरंदरचा आमदार राष्ट्रवादीचा हवा असल्याचेही मी वाचले. पण हे निर्णय जनता घेत असते. तुमच्या इच्छेला त्यामुळे काडीचाही अर्थ उरत नाही. पवार साहेबांची कन्या या एकाच पात्रतेवर आपल्याला आजवर दिलेली संधी आपण काम करायचं सोडून सेल्फी काढत वाया घालवली. त्यामुळे आता बारामतीचा खासदार तुमचा नको ही जनतेची इच्छा आहे. दर निवडणुकीला सासवड, जेजुरीला आपण भेट देऊन लोकल रेल्वे आणायचे आश्वासन देता. मागील १२ वर्ष झाली. आपली लोकल रेल्वे अजून कागदावरसुद्धा नाही. त्यासाठी घंटानाद करायचे आपण विसरलात. असो. एकदा आपली कामे जनतेच्या अवलोकनार्थ जाहीर कराल अशी अपेक्षा करतो.

-विजय शिवतारे