न्यायदेवता आंधळी असते म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या स्पेनची जनता घेत आहे. सामुहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊनही केवळ कायद्याच्या पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे गुन्हा घडला नाही या कारणासाठी सामूहिक बलात्कारातील गुन्हेगारांची शिक्षा तब्बल पाच वर्षांनी घटण्याचा प्रकार स्पेनमध्ये घडला आहे. स्पेनमधील कायद्यानुसार हिंसा, धमकी, बळजबरीचा वापर केल्यावरच तो बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराचा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत स्पेनमध्ये १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

स्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी न ठरवता त्यांना फक्त लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. बलात्कारानंतरच्या एका व्हिडिओत पीडिता स्तब्ध उभी होती आणि तिचे डोळे बंद होते हे दिसते. यावरुन तिची या शरीरसंबंधांना संमती होती, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. कोर्टानेही बचावपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व आरोपींना सामूहिक बलात्काराऐवजी फक्त लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. या आरोपींना आता १४ ऐवजी ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाण्याची चिन्हे आहेत.

प्रतिसाद :- स्पेनमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील न्यायालयाच्या या निकालानंतर महिला संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.