तुमची गृहितके चुकीची आहेत. परदेशातून शिकून आल्यावर वेतन जास्त मिळतेच असे नाही; व उच्च तंत्रज्ञानाची ओळख परदेशातच होते; असे ही नाही.
१ - परदेशातील सर्वच विद्यापीठे सारखीच नसतात. आपल्या प्रमाणे तिथेही "डिग्रीची दुकाने" आहेत. तसेच, अगदी "डिग्रीचे दुकान" नसले, तरी सुमार विद्यापीठे तर बरीच आहेत. एक काळ असा होता कि भारतात "परदेशातील डिग्री" ला एक खास महत्त्व असे. (जसे, लग्नाच्या बाजारात "फोरेन रिटर्नंड" मुलाला असे). पण तो काळ आता गेला. आता व्यवस्थापन खूपच प्रोफेशनल झाले आहे, व नोकरी, पगार इत्यादी ठरवताना, केवळ डिग्री कोणत्या देशातील आहे त्याच्या पलिकडे जाऊन उमेदवाराची सखोल असेसमेण्ट करतात. म्हणून, परदेशातील असले, तरी कोणत्या विद्यापीठातून पदवी घेतली हे महत्त्वाचे.
२ - मात्र, जर नावांजलेल्या विद्यापीठातून पदवी घेतली असेल, तर त्या उमेदवाराची किमान पातळी बरीच उंच असते; ती तशी असणार याची कंपनीला खात्री असते; व म्हणून एकूणच नोकरी मिळण्याची शक्यता वाढते; जास्त चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता खूपच वाढते; जास्त चांगल्या कंपनीत पगार पण चांगला असतोच; इत्यादी.
३- या करता विद्यापीठ परदेशातीलच असले पाहिजे असे अजिबात नाही. भारतातील विद्यापिठांची पण चांगली, सुमार, व "दुकान" अशी वर्गवारी असते. अभियांत्रिकीच्या पदवी करता आयआयटी, व्यवस्थपनाच्या पदवी करता आयआयएम, या नांवाजलेल्या संस्था आहेत, व येथील शिक्षण इतर सुमार (वा "दुकान") संस्थातील शिक्षणाच्या तुलनेत खूपच चांगले असते.
४- परदेशात शिकण्याचा उपयोग काय आहे, काय असावा ?
४.१ - परदेशातील बहुतेक विद्यापीठात शिकविण्याची पद्धत अगदी वेगळी असते. सेल्फ लर्निंग वर खूपच जास्त भर असतो. म्हणजे विद्यार्थ्याला बोट धरून पदवी पर्यंत चालवीत नेत नाहीत, तर त्याला फक्त रस्ता दाखवितात, व रस्त्याने कसे चालायचे ते शिकवितात. भारतात आयआयटी वगैरे सारख्या चांगल्या संस्थां मधून बर्याच अंशी असेच शिकवीतात. म्हणून भारतात आयआयटी इत्यादी संस्थात शिकलेल्यांना हा फरक फ़ारसा जाणवत नाही, पण इतरांना मात्र हे एकदम नवीन असते. "सेल्फ लर्निंग" येणे हे आयुष्यात फार महत्वाचे आहे.
४.२ - परदेशात क्लासरूम मधील शिक्षणाच्या व्यतिरिक्त क्लसरूम बाहेरील शिक्षण पण खूप असते, व माझ्या मते ते क्लासरूम मधील शिक्षणाच्या इतकेच महत्वाचे असते. आणी ते आपल्या देशत मिळत नाही.यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे एका अत्यंत कार्यक्षम कार्यसंस्कृतीची (वर्क कल्चर) ओळख होते. उदाहरणार्थ - परदेशात बँकेत गेल्यावर सर्व ग्राहक काऊण्टर समोर लायनीत उभे असतात, काऊण्टर जवळ डावी कडून / उजवी कडून गर्दी करीत नाहीत. काउण्टरच्या पलीकडे बँक कर्मचारी जलद गतीने एकेकाची काम उरकत जातो. काम अर्धवट सोडून मध्येच शेजार्याशी वायफळ गप्पा मारीत नाही. वगैरे. किंवा पादचारी कुठेही रस्ता क्रॉस करीत नाहीत. त्या मुळे वाहन चालकांवर पण हॉर्न वाजविण्याची वेळ सहसा येत नाही. पादचारी फक्त झेब्रा क्रॉसिंग वरच रस्ता क्रॉस करतात, व ते पण रस्ता क्रॉस करण्या करता हिरवा दिवा असेल तेव्हांच. इत्यादी. क्लासरूम बाय्ह शिक्षण हा खूपच विस्त्रूत विषय व त्या करिता एक स्वत्रंत लेख लिहावा लागेल.