तुमचा तपशीलवार खुलासा मला पटला किंवा नाही हा मुद्दा आता गैरलागू आहे, कारण निवडणूक झाली आणि ती मोदींनी प्रचंड बहुमताने जिंकली. तुम्ही आणि मी तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही.

विनायक - हा तुमचा तर्क अमान्य. कारण  या न्यायाने इतिहासातील कोणत्याच घटनेची चीरफाड करता येणार नाही. पानिपतच्या  तिसऱ्या  लढाई  पासून  ते  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धे पर्यंत, प्रत्येक बाबतीत हेच म्हणता येईल, कि जे व्हायचे ते झाले आणि आता भाउसाहेबांनी जर अमुक केले असते, किंवा विराट कोहोलीने तमुक केले असते, . . . असा तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही. मात्र संजय क्षीरसागर काहीही यांच्या बरोबर चर्चा करून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण, संजय क्षीरसागर यांचे तर्क चलाखीचे, फसवे, व दिशाभूल करणारे असतात. या प्रतिसादात  संजय क्षीरसागर यांची चर्चा करण्याची पद्धत फसवी व दिशाभूल करणारी कशी, त्याचे विश्लेषण आहे, त्यांच्या (कु)तर्कांची काही उदाहरणे घेऊन.

१- १३० कोटी  जनतेत एकही लायक माणूस नाही हे लोकांना पटलं तरी कसं हे एक आश्चर्य आहे !
फसवा तर्क. कारण १३० कोटी  लोक (यात सहा महिन्यांची रांगती बाळे, तसेच ९५ वर्षांचे अतिवृद्ध पण आले) पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निवडणुकी करता उभे नव्हते. क्षणभर असे मानुया कि इंफोसिस चे नारायण मूर्ती किंवा श्री श्री रवी शंकर हे पंतप्रधान म्हणून जनतेला अधिक योग्य वाटले असते. पण त्यांना निवडण्याची संधीच नव्हती कारण ते निवडणूक लढवतच नव्हते. १३० कोटी तर दूरच, १३ दावेदार सुद्धा नव्हते. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात ममता बॅनर्जी, मुलायमसिंग, मायावती, चंद्राबाबू नायडू, व कदाचित शरद पवार, असे पाच इच्छुक होते. तर, हे पाच व मोदी, आणि राहुल,  असे एकूण फक्त ७ दावेदार होते. पण जसजशी निवडणूक जवळ आली, पहिल्या पाच जणांच्या लक्षात आले, कि पंतप्रधान होण्या करता आवश्यक ते संख्य्याबळ त्यांना  मिळणे केवळ अशक्य आहे. शेवटी उरले फक्त दोघे - मोदी, आणि राहुल गांधी. तर, लोकांना फक्त या दोघांच्यातच निवड करायची होती, १३० कोटीत नव्हे. 

२-  संपला का भ्रष्टाचार ?  चलाख प्रश्न. कारण, भ्रष्टाचार कधीच "संपत" नसतो. जगात कोणत्याही देशात भ्रष्टाचार "संपलेला" नाही. पाकिस्तान वगैरे जाउद्या पण इस्राएल चे नेटान्याहू, जपानचे केकुई टनाका आणि हितोशी अशिदा, ही प्रगत देशातील भ्रष्टाचाराची उदाहरणे आहेत. तर, भ्रष्टाचार कमी होऊ शकतो, संपवता येत नाही.  म्हणून संजय "भ्रष्टाचार कमी झाला का?", असा प्रश्न विचारीतच नाहीत. कारण त्याचे उत्तर "होय, निश्चीतच कमी झाला" असेच येईल. 

मोदींच्या पाच वर्षांच्या काळात, त्यांच्यावर व्यतिश: किंवा इतर कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचारचे आरोप झाले नाहीत. मनमोहन सिंग यांच्या काळात जसे टू-जी स्पेक्ट्रम स्कॅम, कोळसा खाण स्कॅम, ओगस्टा हेलिकॉप्टर स्कॅम; कॉमन वेल्थ गेम्स स्कॅम; असे अनेक स्कॅम झाले, तसे भाजपा सरकारच्या काळात एक पण स्कॅम झाला नाही. (राफेलचे सांगू नका. कोंग्रेस, आणि फक्त कोंग्रेसने निवडणूकां पुरता तो आरोप केला. पण राफेल खरेदीत स्कॅम झाला याच्या वर शेंबड्या पोराचा पण कधीच विश्वास बसला नाही. हा आरोप केवळ निवडणूकां पुरताच होता याचा साधा पुरावा असा, की आता निवडणूका झाल्या वर कोंग्रेसने सुद्धा तो मुद्दा सोडून दिला आहे). 


३- बुलेट ट्रेन > १.१० लाख कोटी परकीय चलनात कर्ज. बसणार आहात का कधी बुलेट ट्रेन मध्ये ?  निव्वळ  मूर्खपणा !   

"मूर्खपणा" हा शब्द तुम्ही आधी वापरला हे एक बरे झाले, म्हणजे आता मी पण तो शब्द वापरला, तर मनोगतच्या व्यवस्थापनाला आक्षेप घेण्याचे कारण नाही.

"बसणार आहात का कधी बुलेट ट्रेन मध्ये ?" हा प्रश्न शुद्ध मूर्खपणाचा आहे. देश ज्या पायाभूत सुविधां मध्ये इन्वेस्ट करतो, त्यातील बहुतेक माझ्या व्यक्तिश: उपयोगाच्या नाहीत. मी आता बुलेट ट्रेन मध्ये बसण्याची शक्यता कमी आहे. पण त्याही पेक्षा कमी शक्यता मी चेन्नई – तिरूचिरापल्ली या ट्रेन मध्ये बसण्याची; किंवा मिझोराम येथे ऐझोलला जाणार्‍या विमानात बसण्याची आहे. म्हणून मी काय चेन्नई – तिरूचिरापल्ली या ट्रेनला, किंवा ऐझोल विमानतळाला विरोध करावा ? 

पण आपल्या देशात काही लोकांना ही सवय असते, की कोणत्याही गोष्टीचा विरोध करावयाचा असला, की देशातील काही तरी न्यून दाखवायचे, व "देशात अमूक आहे, आणी तुम्हाला तमूक पाहिजे?" असा प्रश्न विचारायचा. 1982 साली वसंतराव साठे केंद्रात मंत्री असताना त्यांनी देशात रंगीत टीवी आणायचे ठरविले तेव्हां त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता - "मेळघाटात बालके कुपोषण ग्रस्त आहेत, आणी तुम्हाला रंगीत टीवी पाहिजे?" प्रश्नाच्या पूर्वार्धात "मेळघाटात बालके कुपोषण ग्रस्त आहेत, किंवा शेतकरी आत्महत्या करीत आहेत", असा दाखला द्यायचा आणी मग उत्तरार्धात "तुम्हाला रंगीत टीवी/ आधुनिक कार / क्वार्ट्झ घड्याळे/ मॉल्स/ मल्टीप्लेक्स/ मेट्रो ट्रेन/ बुलेट ट्रेन/ ए-380 विमान/ भारता ऑलिंपिक गेम्स . . . .  पाहिजेत ? असा काहीही प्रश्न टाकायचा.

जवळपास पंधरा वर्षांपूर्वी आपण भारतात पहिली आधुनिक मेट्रो दिल्लीत आणली. आता आपण मेट्रो तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करीत आहोत. बुलेट ट्रेन भारतात सुरू झाल्या नंतर भारतात बनलेले बुलेट ट्रेनचे डबे निर्यात करण्याच्या गोष्टी आता पासूनच सुरू झाल्या आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो, की संजय व तत्सम महाभागांना आधी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणे, मग ते आत्मसात करणे, व मग त्याची निर्यात करून अर्थोंन्नती करणे, हे त्यांना खरोखर समजत नाही, का ते तसे सोंग घेतात.

असो. ही तीन उदाहरणे संजय क्षीरसागर यांचे तर्क चलाखीचे, फसवे, व दिशाभूल करणारे कसे असतात, हे समजून घेण्यास पुरेशी असावीत. 
चेतन पंडित