अध्यात्माची सांगड चमत्कारांशी घालून तथाकथित काहीही न समजलेल्या अज्ञानी लोकांनी ब्रह्म म्हणजे फार मोठी भानगड आहे असा गैरसमज पूर्वापार आणि खोलवर रुजवला आहे.
आध्यात्मिक जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन कायम वैज्ञानिक हवा. कोणत्याही घटनेला चमत्कार ठरवण्यापूर्वी तिची (१) वारंवारिता (२) व्यक्तीनिरपेक्षितता आणि (३) स्थल-काल विहीनता सिद्ध व्हायला हवी. भिंत खरंच चालली असेल तर प्रत्येकाला ती चालवता यायलाच हवी नाही तर ती अफवा आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन नसल्यानं लोक कुणालाही शरण जातात, काहीही अवाच्यासवा कल्पना करतात आणि मग फसतात. यामुळे अध्यात्म बदनाम झालं आहे.
कर्मसिद्धांत हा असाच बोगस आणि निराधार प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वसंचिताचा डेटाबेस ठेवणारा कुणीही नाही, मुळात असा डेटा कुठेच स्टोअर होत नाही मग त्याचा परिणाम घडवणारी यंत्रणा कशी काम करेल ? अशी कुठलीही यंत्रणाच अस्तित्वात नाही. व्यक्तीची स्वतःची स्मृती हाच काय तो तिचा व्यक्तिगत डेटाबेस आहे किंवा तिनी कुणाला सांगितलं असेल अथवा रेकॉर्ड केलं असेल तर तो एक्सटेंडेड डेटाबेस होईल. शिवाय व्यक्ती गेल्यावर ज्या मेंदूवर तो स्टोअर झाला होता ती हार्डडिस्क पूर्णपणे फॉर्मॅट होते त्यामुळे मागचं पुढे जाण्याचा प्रश्नच नाही.
तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे " आत्मा अमर आहे किंवा ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे हा नियम म्हणजे माझ्या मते आजचा प्रिंसिपल ऑफ काँझरवेशन ऑफ मास अँड एनर्जीचा नियम." हा ब्रह्माचा अर्थ नाही.
ब्रह्म म्हणजे ज्यावर सर्व प्रकट होतंय ती व्यापक नीराकारिता. ही नीराकारिता अमर आहे कारण मुळात तिचा जन्मच झालेला नाही. ती एक कायम स्थिती आहे. आणि आपण त्या कायम स्थितीचा अंश नाही तर ती कायम स्थितीच आहोत कारण नीराकारितेचं विभाजन होऊ शकत नाही. याला अद्वैत म्हटलंय.
कल्पना करा एक महाल आहे त्यानं काही जागा व्यापली आहे ( महालाखालची जमीन नाही कारण पृथ्वी सुद्धा कालौघात लयाला जाईलच). महाल बांधण्यापूर्वीही ती जागा तिथे होती, आज महाल असताना सुद्धा ती तशीच आहे (भिंतींच्या आरपार आहे) आणि महाल यथावकाश ध्वस्त होईल तेव्हा ही ती तशीच असेल. त्या जागेचं अस्तित्व नाकारता येत नाही कारण तिच्याशिवाय महालाची निर्मिती असंभव आहे. त्या जागेचा जन्म झालेला नाही कारण ती नव्हती किंवा नसेल अशी कुठली वेळ नाही. ती जागा म्हणजे ब्रह्म !