स्वतःला थोतांड मानायला तरी आपण हवेच ना !
राहुल सांकृत्यायन सोडा, तुम्ही स्वतः या क्षणी आहात की नाही ? हा स्वतःला (किंवा ब्रह्माला) थोतांड समजणारा कोण आहे ? आणि त्याच्या हजेरीशिवाय हे थोतांड कसं ठरेल ? पुनर्जन्म थोतांड आहे कारण त्याला शास्त्रीय आधार नाही पण आपण आहोत हा प्रत्यक्ष पुरावा आहे, त्याला कुणी थोतांड कसं म्हणू शकेल ?
आणि ब्रह्म हा सुद्धा शेवटी शब्दच आहे ! तुम्ही स्वतःला काहीही म्हणा किंवा म्हणू नका तरीही तुम्ही आहातच ! मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच. हा मी आपल्या सर्वांचा एक आहे आणि त्याला ब्रह्म म्हटलंय. राहुल काय की तुम्ही काय एकाच संभ्रमात आहात तो म्हणजे स्वतःला व्यक्ती समजणं !
एका साध्या उदाहरणानं सगळा उलगडा होईल, मासा आंहे आणि समुद्र आहे. माशाला समुद्रावेगळं स्वतःचं अस्तित्व नाही. वास्तविकात समुद्रच माशातून प्रकट झाला आहे. ज्या क्षणी मासा समुद्र नाकारेल त्या क्षणी त्याला आपण वेगळे आणि एकटे आहोत असं वाटेल (खरं तर तसा भ्रम होईल कारण त्याच्या मानण्यावर समुद्राचं असणं ही अवलंबून नाही आणि त्याची समुद्राशी असलेली एकरूपता ही खंडीत होत नाही) . हे माशानं समुद्राला नाकारणं म्हणजे स्वतःला व्यक्ती समजणं आहे आणि अध्यात्माबद्दल अनभिज्ञ लोक काहीही म्हणोत, तोच अहंकार (इगो ) आहे. अहंकार म्हणजे स्वतःला भारी समजणं नाही तर स्वतःला व्यक्ती समजणं आहे. हा व्यक्तिमत्त्वाचा फोलपणा कळला की आपण ब्रह्म आहोत, कारण व्यक्तिमत्त्व ही जगण्यासाठी उपयोगी असलेली सामाजिक सोय आहे; ती वस्तुस्थिती नाही.