१. आपण सत्य आहोत ही जाणीव होण्यासाठी दीर्घकाल वर्तमानात असण्याची आवश्यकता आहे. सर्व साधना साधकाला वर्तमानात आणणं हे एकच काम करतात. प्रणय साधकाला नैसर्गिकपणे वर्तमानात आणतो. परंतु जोपर्यंत प्रणयातला आवेग शांत होत नाही तोपर्यंत साधक वर्तमानात येऊ शकत नाही, कारण त्याचा रोख क्रियेवर राहातो; जाणीवेचा रोख स्वतःप्रत येत नाही. तस्मात, साधना म्हणून केलेल्या प्रणयाचा कालावधी दीर्घ असायला हवा.
२. निरभ्रांत म्हणजे चिंतामुक्त. प्रणयाच्याबाबतीत सांगायचं तर मनावर वेळेचं दडपण नको आणि मनात कोणताही अपराध भाव नको.
३. साधना म्हणून प्रणय केवळ वैवाहिक नात्यातच का सिद्ध होऊ शकतो याची कारणं लेखात दिली आहेत; पुन्हा उधृत करतो. विवाहेतर प्रणयात देण्याऐवजी घेण्याचा भाव असतो. अशा संबधात अपराधभाव दाटून येण्याची शक्यता नक्की आणि तो एकाच्या जरी मनात आला तरी स्वास्थ्य हरण करायला पुरे ! शिवाय एकमेकांप्रती अनुबंध आणि बांधिलकी विवाहेतर संबंधात अशक्य आहे. सरते शेवटी राहिली ती निरभ्रांत चित्तदशा, जी पुरुषाची असावी लागते आणि ती स्त्रीमध्ये परावर्तित व्हावी लागते कारण स्त्री स्वभाव नेहेमी भविष्यकालीन ओढीनं ग्रस्त असतो. ओशो या चित्तदशेबद्दल एक शब्दही बोललेले नाहीत. थोडक्यात, साधना म्हणून केलेल्या प्रणयायाला वैवाहिक नात्याची नितांत आवश्यकता आहे आणि ओशोंच्या लक्षात नेमकी हीच गोष्ट आली नाही.
४. निर्मितीपश्चात कामासक्ती शून्य होण्याची प्रक्रिया मनुष्येतर सजीवात घडते, मानवी कामेच्छा सक्षम शरीरात जागृत असते. त्यामुळेच प्रणयाचा उपयोग स्वतःशी एकरूप होण्यासाठी होऊ शकतो आणि अष्टावक्रानी त्याबद्दलच नेमका चुकीचा प्रश्न विचारल्यानं हा लेख लिहीला आहे.